‘त्रिदेव’, ‘गुनाहों का देवता’ या चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री संगीता बिजलानी लवकरच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा आहेत. ‘स्टार’ वाहिनीवरील ‘इश्कबाज’ या मालिकेतून पुन्हा एकदा तिचा ग्लॅमरस अंदाज पाहता येणार आहे. बॉलिवूडमध्ये एकेकाळी आपल्या हॉट अदांसाठी ओळखल्या जाणाऱ्या संगीताचं नवं रुप पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता पाहायला मिळत आहे.

‘स्पॉटबॉय इ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार संगीता या मालिकेत नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मालिकेत काम करण्यासाठी निर्मात्यांनी संगीताकडे विचारणा केली आहे. तिनेसुद्धा या प्रस्तावाविषयी विचार करण्यास सुरुवात केली असून, आपल्या भूमिकेविषयी उत्सुकता दर्शवली आहे. तेव्हा आता ‘इश्कबाज’ मालिकेतील ‘ओबेरॉय’ कुटुंबात येणारं हे सौंदर्याचं वादळ कोणती नवी वळणं आणतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण…

एक अभिनेत्री म्हणून संगीताला जितकी प्रसिद्धी प्राप्त आहे, त्याहीपेक्षा जास्त ती सलमान खानची पूर्वाश्रमीची प्रेयसी म्हणून ओळखली जाते. सलमानसोबतचं तिचं नातं बी- टाऊनमध्ये एकेकाळी चर्चेचा विषय ठरलं होतं. आज त्यांच्यात फक्त मैत्रीचं नातं असलं तरीही दबंग खानच्या ‘लव्ह लाइफ’चा विषय निघाल्यावर संगीताचा उल्लेख आवर्जून केला जातो. त्याच्यासोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर संगीताने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केलं होतं. त्यामुळेसुद्धा तिच्याविषयीच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. संगीता गेल्या बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण, सलमान खानच्या कौटुंबिक समारंभात आणि विविध बॉलिवूड पार्ट्यांमध्ये ती आवर्जून हजेरी लावते. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय आहे.