निर्माता- दिग्दर्शक करण जोहर नेहमीच चर्चेत असतो. कोणत्याही कलाकाराच्या लिंक- अप आणि ब्रेकअपपासून ते अगदी घराणेशाहीच्या वादापर्यंत करणचं नाव प्रत्येक गोष्टीत चर्चेत आल्याचं पाहायला मिळतं. अशाच एका चर्चेत पुन्हा एकदा त्याचं नाव समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका सिमी गरेवाल करणवर नाराज असल्याचं कळतय. ट्विटरच्या माध्यमातूनच त्यांनी ही नाराजी व्यक्त केलीय.

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा सेलिब्रिटी टॉक शो सिमी गरेवाल यांच्या ‘रेंदेवू विथ सिमी गरेवाल’ rendezvous with simi garewal याच कार्यक्रमापासून प्रेरित असल्याचं सांगितलं जात होतं. करणच्या नव्या जोमाच्या या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांनीही सिमी यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत करणच्या कार्यक्रमाला पसंती दिली होती. त्यामुळे एका अर्थी करणने त्यांच्यावर कुरघोडीच केल्याचंही म्हटलं जात होतं.
‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न’ या कार्यक्रमाचे सिमी यांनी नुकतेच सूत्रसंचालन केले. कार्यक्रमानंतर करण जोहरने शोच्या दिग्दर्शकांना पुढच्या वेळी आपल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी देण्यात यावी अशी विनंती केली. हीच बाब जेव्हा सिमी यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी लगेचच ट्विट करून पुन्हा एकदा आपल्यावर करणने कुरघोडी केल्याचं म्हटलं. या सर्व परिस्थितीमुळे सिमी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

या पुरस्कार सोहळ्याला बी- टाऊनच्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यातीलच एक सेलिब्रिटी म्हणजे करण जोहर. करणला या शोमध्ये पुरस्कार मिळणार होता. मुख्य म्हणजे एकेकाळी सिमी आणि करणमध्ये त्याच्या सेलिब्रिटी चॅट शोमध्ये असणाऱ्या स्पर्धेमुळे ‘कोल्ड वॉर’ पाहायला मिळालं होतं. त्याच धर्तीवर हे प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचं म्हटलं जात आहे. सिमी यांनी ट्विट केल्यानंतर काही ट्विटर युजर्स त्यांच्या समर्थनार्थ धावून आले आणि त्यांच्या सूत्रसंचालन शैलीची प्रशंसा केली. मुख्य म्हणजे सिमी यांची पाठराखण करताना बऱ्याचजणांनी करणवर आगपाखड केली.