सण म्हटलं की आनंद उत्साह आलाच. पण, चित्रपट रसिकांच्या बाबतीत या उत्साहाचं समीकरण जरा वेगळं आहे. यामागचं कारण आहे बी- टाऊन सेलिब्रिटी. विविध बॉलिवूड सेलिब्रिटी सण- उत्सवाचं निमित्त साधत त्यांच्या आगामी चित्रपटांचं प्रमोशन करतात, फर्स्ट लूक प्रदर्शित करतात किंवा मग थेट चित्रपट प्रदर्शित करतात. अशा या कलाकारांच्या यादीत सलमान खानचं नाव सर्वात वर येतं. यंदाच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सलमानने पुन्हा एकदा दिलेला शब्द पाळला असून, त्याच्या आगामी चित्रपटाचा पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातील आपला पहिला पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत त्याने सर्वांचच लक्ष वेधलं आहे.

‘जखमी वाघासारखी शिकार कोणीच करु शकत नाही’, अशी लक्षवेधी ओळ लिहीत हा टायगर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘नो वन हंट्स लाइक वाऊंडेड टायगर’ असं या फोटोवर लिहिलं असून, हातात मशिनगन, भेदक नजर असा त्याचा एकंदर लूकसुद्धा लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाविषयी आता प्रेक्षकांमध्ये विविध चर्चा रंगण्यास सुरुवात होणार यात शंकाच नाही. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमानची जोडी. प्रेक्षकांची सर्वात आवडती ऑनस्क्रीन जोडी पुन्हा एकदा ‘टायगर जिंदा है’च्या निमित्ताने एकत्र काम करणार असल्यामुळे त्यांची केमिस्ट्री पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर कॅट आणि सलमान एकत्र येणार असल्यामुळे ही बाबही चित्रपटासाठी लाभदायक ठरू शकते.

वाचा : ‘शोले’मध्ये ठाकूरची भूमिका साकारणार होते धर्मेंद्र, पण…

यंदाच्या वर्षअखेरीस सलमान ‘टायगर जिंदा है’ मधून एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांनाच नाही तर खुद्द सलमानलाही फार अपेक्षा आहेत. कारण, त्याचा ट्युबलाइट या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी दाद मिळाली नव्हती. तेव्हा आता हा ‘टायगर’ प्रेक्षकांची मनं जिंकतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.