भारत-चीन युद्धावर आधारित असलेला सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘ट्युबलाइट’ Tubelight चित्रपट येत्या ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात चिनी अभिनेत्री झू झू हीदेखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत असून, प्रमोशनसाठी ती भारतात येणार असल्याचे कळते.

वाचा : प्रभासला मिळाली त्याची ‘दुल्हनिया’?

सलमान Salman Khan आणि दिग्दर्शक कबीर खानचा हा एकत्र तिसरा चित्रपट आहे. याआधी त्यांनी ‘बजरंगी भाईजान’, ‘एक था टायगर’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘ट्युबलाइट’मध्ये सलमानसोबतच सोहेल खान आणि झू झूची Zhu Zhu महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याविषयी कबीर म्हणाला की, माझ्या चित्रपटांमध्ये अभिनेत्रीला नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका असते. झू झू हिची चित्रपटात प्रमुख भूमिका असून, त्याबद्दल अद्यापपर्यंत आम्ही फारसे बोललेलो नाहीत. आता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झू झू भारतात येणार आहे. मात्र, तिच्या भारत दौऱ्याची आम्ही अजूनतरी योग्य आखणी केलेली नाही.

वाचा : ‘ट्युबलाइट’च्या सेटवर सलमानच्या चित्रकलेचा लखलखाट

‘पीके’ आणि ‘दंगल’ या चित्रपटांनी चीनमध्ये चांगली कमाई केली आहे. त्यामुळे ‘ट्युबलाइट’सुद्धा चीनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. भारतीय चित्रपटांना चीनमध्ये प्रदर्शित करण्याची वेळ येते तेव्हा तेथील मार्केट अगदी वेगळे असते. तेथे आधी चित्रपटाचे सादरीकरण करावे लागते. जर चित्रपट त्यांना आवडला तरच ते प्रदर्शनासाठी हिरवा कंदिल देतात, असेही कबीरने Kabir Khan सांगितले. दरम्यान, ‘ट्युबलाइट’ हा हॉलिवूडपट असलेल्या ‘लिटल बॉय’सारखाच असल्याचे म्हटले जात आहे. पण कबीरच्या मते त्यांनी या चित्रपटाची केवळ संकल्पना घेतली आहे. ‘ट्युबलाइट’ हा चित्रपट १९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धावर आधारित आहे.

‘ट्युबलाइट’चे चित्रीकरण लडाख, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये करण्यात आले आहे. चित्रपटात दिवंगत अभिनेते ओमपुरी, बालकलाकार माटिन रे तंगू, सोहेल खान यांच्याही भूमिका असून, शाहरुख खान यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल.