जम्मू काश्मीरमधील उरी येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विनोदी कलाकार राजू श्रीवास्तवने पाकिस्तानमधील कार्यक्रम रद्द केला आहे. विनोद हा अंत:करणातून यावा लागतो, तो ओढून ताणून आणता येत नाही, त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या परिस्थितीत कराचीमधील प्रेक्षकांना हसविणे योग्य ठरणार नसल्याचे राजू श्रीवास्तवने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. उरीमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मी घेतलेला हा निर्णय निषेध समजावा असेही तो यावेळी म्हणाला.
उरीमधील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतवासियांमध्ये पाकिस्तानविरुद्ध संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत. राजकीय पक्षातूनही पाकिस्तानी कलाकारांच्या भारतामधील कार्यक्रमांना विरोध केला जात आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेने शुक्रवारी पाकिस्तानी कलाकारांचा एकही कार्यक्रम भारतात होऊ देणार नसल्याचे सांगत पाक कलाकारांना घरवापसी करण्याचा इशारा दिला होता. तर झी नेटवर्कने पाकिस्तानी कलाकारांच्या मालिका बंद करण्याचा घेतलेला निर्णय आणि विनोदी कलाकाराने पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय हा भारत पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे सहसा क्रिकेट सामन्यांवर दिसणारे सावट आता बॉलिवूड कलाकार आणि मनोरंजन क्षेत्रामध्येही डोकावताना दिसत आहे.
यापूर्वी, २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान राजू श्रीवास्तवने समाजवादी पक्षात प्रवेश करुन कानपूरमधून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक पातळीवर योग्य तो पाठिंबा मिळत नसल्याचे कारण देत श्रीवास्तवने समाजवादी पक्षाला ‘बाय-बाय’ केले होते. यानंतर त्याने भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला होता.