मशिदीमध्ये होणाऱ्या अजानविरोधात ट्विट केल्यानंतर गायक सोनू निगमविरोधात हरयाणातील न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय दंडविधान संहिता कलम २९४, २९५, २९५ अ, २९६, ५००, ५०१ नुसार ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियावर अजानविरोधात वक्तव्य केल्याबद्दल त्याच्याविरोधात ही तक्रार करण्यात आली.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याने ‘देव सर्वांचं भलं करो. मी मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते. भारतात बळजबरीने चालणाऱ्या या धार्मिक रुढी कधी थांबणार?’ असे ट्विट केले होते. त्याच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. काहींनी सोनूचे समर्थन केले तर अनेकांनी विरोध. पश्चिम बंगालच्या सईद शाह अल कादरी यांनी सोनू निगमचं मुंडन करुन, चपलांचा हार गळ्यात घालून जो सोनूला देशभर फिरवेल त्याला १० लाख रूपयांचं बक्षीस देईन, असे म्हटले होते.

कादरी यांना उत्तर म्हणून सोनूने केसही कापले. ‘पण, मी कोणाला काही सिद्ध करुन दाखवण्यासाठी केस कापत नाही, मी स्वेच्छेने केस कापतो आहे,’ असेही त्याने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सोनूने केस कापल्यानंतर सईद शाह अल कादरी यांना ते १० लाख रुपये देणार का? असा प्रश्न विचारला असता, ‘मी सांगितलेल्या तीन गोष्टींपैकी एकच गोष्ट सोनूने पूर्ण केली आहे. उरलेल्या दोन गोष्टी जेव्हा तो पूर्ण करेल तेव्हा मी १० लाख रुपये देईन,’ असे उत्तर कादरी यांनी दिले.