दंगल चित्रपटात एका कुस्ती प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये झळकलेला अभिनेता गिरीश कुलकर्णी पुन्हा एकदा आणखी एका बॉलिवूड चित्रपटामध्ये झळकणार आहे. डीएनए या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अभिनेता गिरीश कुलकर्णी हृतिक रोशनची मुख्य भूमिका असणाऱ्या आगामी ‘काबिल’ या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता गिरीश कुलकर्णीने ‘दंगल’ या चित्रपटामध्ये साकारलेल्या एका प्रशिक्षकाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगचीच दाद दिली होती.

दरम्यान ‘काबिल’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना गिरीश कुलकर्णी म्हणाला की, ‘मला साचेबद्ध भूमिका करायला आवडत नाहीत. त्यामुळे ‘अग्ली’ या चित्रपटात पोलिसाची व्यक्तिरेखा साकारल्यानंतर पुन्हा एकदा पोलिसाची भूमिका साकारायची नाही असे मी ठरवलेच होते. पण, राकेशजींबद्दल (राकेश रोशन) माझ्या मनात फार आदर असल्यामुळे मी त्यांचा प्रस्ताव नाकारु शकलो नाही’, असे डीएनएने प्रसिद्ध केले आहे.

‘दंगल’ या चित्रपटामध्ये गिरीशने एक नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारल्यामुळे त्याच्या भूमिकेची एक वेगळी बाजू पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली होती. आमिरच्या काही चाहत्यांच्या मनात तर गिरीशसाठी रागाची भावनाही निर्माण झाली आहे. याविषयीचा अनुभव सांगताना गिरीश कुलकर्णीने त्याचा अनुभवही शेअर केला. ‘तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण, ‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा मुलगा माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या पोटात ठोसा मारत म्हणाला की ‘आमिर काकांना तुम्ही एका खोलीत बंद करुन शिक्षा देण्याची हिंमत तरी कशी केली?’. मी जिथेही जातो तिथे लहान मुलं माझ्यापासून दूर पळतात. काही मोठी माणसं तर माझ्याकडे रागाचा कटाक्ष टाकतात’, असे गिरीश म्हणाला. प्रेक्षकांच्या या अशा प्रतिसादाकडे आपण सकारात्मक दृष्टीकोनानेच पाहतो असेही गिरीशने स्पष्ट केले.

दरम्यान, गिरीश कुलकर्णी ‘काबिल’ या चित्रपटाद्वारेही प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी होणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री यामी गौतम अंध व्यक्तिरेखा साकारत आहेत. राकेश रोशन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे. त्यामुळे आता प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला कौल देतात हे लवकरच कळेल. २५ जानेवारीला हृतिकचा काबिल हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तर त्याच दिवशी शाहरुख खानचा रईस हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.