दीपिका पदुकोण हिचा बहुचर्चित ‘पद्मावती’ हा सिनेमा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्यावर वाद सुरू आहेत. चित्रीकरण सुरु झाल्यापासूनच सेटवर करण्यात आलेली तोडफोड, भन्साळींच्या तोंडाला काळे फासणे असे काही ना काही प्रकार घडत आलेत. त्यातच रांगोळी आर्टिस्ट करणने ४८ तास मेहनत करून साकारलेली रांगोळी काही समाजकंटकांनी काही मिनिटांतच पुसून टाकली. या संपूर्ण प्रकरणाने अस्वस्थ झालेल्या दीपिकाने समाजकंटकांच्या अशा वागण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘करणच्या रांगोळीची नासधूस करणं, त्याच्यावर हल्ला करणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. हे लोक कोण आहेत? या कृत्यामागे कोणाचा हात आहे? हे कधीपर्यंत सुरू राहाणार? आपण या गोष्टी कधीपर्यंत खपवून घेणार आहोत? कायदा हातात घेऊन एखाद्याच्या व्यक्तीस्वतंत्र्यावर हल्ला करणं हे आणखी किती दिवस सुरू राहणार? आता हे थांबवण्याची वेळ आली आहे आणि अशा लोकांवर कडक कारवाई होणं आवश्यक आहे’, असं ट्विट करत दीपिकाने आपली नाराजी व्यक्त केली. दीपिकाने केंद्रीय वस्त्रोद्यग आणि माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडेही मदत मागितली.

‘पद्मावती’ सिनेमाचा दमदार ट्रेलर पाहून रांगोळी आर्टिस्ट करण के यांनी पद्मावतीच्या वेशातील दीपिकाची भव्य रांगोळी साकारली होती. ती काढण्यासाठी करणाला ४८ तास लागले. पण, समाजकंटकांनी अवघ्या काही मिनिटांतच रांगोळीची नासधूस केली. १०० लोकांच्या एका घोळक्याने ‘जय श्री राम’च्या घोषणा देत माझ्या कित्येक तासांच्या मेहनतीवर पाणी फेरले. करणनेदेखील ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद, करणी सेनेचा या चित्रपटाला असलेला आक्षेप या सगळ्यामुळे मनस्ताप सहन कराव्या लागलेल्या दीपिकाने नाराजी व्यक्त करत स्मृती इराणींना मदतीसाठी साकडं घातलं आहे.

‘पद्मावती’ चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच त्यात काही ना काही अडथळे येत आहेत. राजस्थानमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेटवर तोडफोड केली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी संजय भन्साळी यांच्या कानशिलातही लगावली होती. हा वाद पाहता ‘पद्मावती’च्या प्रदर्शनामध्ये कोणताही अडथळा येणार नाही असं आश्वासन स्मृती इराणींनी दिलं होतं.