बॉलिवूड मस्तानी दीपिका पदुकोणचा पहिला वहिला हॉलिवूडपट सर्वप्रथम भारतामध्ये प्रदर्शित झाल्यानंतर . ‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून भारतीयांना आपल्या हॉलिवूडमधील हटके अंदाजाने घायाळ केल्यानंतर दीपिका आता जगभरातील चाहत्यांवर आपली जादू पसरविण्यास सज्ज झाली. २० जानेवारीला दीपिकाचा पहिला वहिला हॉलिवूडपट जगभरामध्ये प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने दीपिका सध्या अमेरिकेमध्ये चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतेच दीपिकाने अमेरिकेतील लोकप्रिय चॅटशोच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. हॉलिवूडच्या चित्रपटाची प्रसिद्धी करताना तिने या कार्यक्रमात बॉलिवूडची झलक दाखवून दिली.

दीपिकाने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या जेम्स कॉर्डनला बॉलिवूडमधील नृत्य शिकवले. एवढेच नाही तर या कार्यक्रमात दीपिकाने जेम्सला जॅकेट वापरण्याची नवी शैली देखील शिकवताना दिसली. दीपिकाने जेम्सला त्याचे जॅकेट कंबरेला बांधण्यास सांगितले. त्यानंतर त्याला आपल्या ‘चन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटातील ‘लुंगी डान्स..’ या गाण्यावर थिरकायला भाग पाडले. यापूर्वी दीपिकाने भारत दौऱ्यावर आलेल्या विन डिझेलला लुंगी नेसवून नाचविल्याचे पाहायला मिळाले होते. दीपिकाने ‘चन्नई एक्स्प्रस’ या चित्रपटामध्ये शाहरुख खान सोबत स्क्रिन शेअर केली होती. हे गाणे भारतामध्ये चांगलेच लोकप्रिय ठरल्याचे पाहायला मिळाले होते. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी देखील या गाण्यावर थिरकल्याचे दिसले होते.

आता विन डिझेल आणि जेम्सला या गाण्यावर थिरकायला लावल्यामुळे बॉलिवूडच्या या गाण्याची लोकप्रियता जगभरामध्ये होईल, यात शंका नाही. दीपिकाच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाची भारतातील प्रसिद्धी धमाकेदार झाली होती. खुद्द हॉलिवूड अभिनेता विन डिझेल दीपिकाच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी भारतामध्ये आला होता. दीपिकाने विनचे स्वागत पारंपारिक पद्धतीने केल्याचे दिसले. दीपिकासह बॉलिवूडच्या अनेक मंडळींनी विनची भेट घेतली होती.

दीपिकाने भारतात दाखल झालेल्या विन बद्दल म्हटले होते की, तो एक टेडी बिअरसारखा आहे. तो नेहमीच माझ्यासाठी उभा असतो. तो माझ्यासोबत असला की मला फार आरामदायक वाटते. सेरेनाही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्याने मला खूप आत्मविश्वास दिला.’ दीपिकाने विनला टेडी बिअर म्हटल्यानंतर लगेचच विनने प्रेक्षकांकडे वळत सगळ्यांना विचारले की, तुम्हाला मी टेडी बिअर दिसतो की एक म्हातारा बिअर? अर्थात भारतामध्ये चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये धम्माल केल्यानंतर दीपिका ध्या अमेरिकेतही धमाकेदार प्रमोशन करताना दिसते.