कलाकार ओळखला जातो तो त्याच्या अभिनयाने. कोणत्याही कलाकारासाठी रंगमंच किती महत्त्वाचा असतो हे आपण जाणतोच. ज्या रंगमंचावर उभे राहून आपण पहिला प्रयोग करतो त्याक्षणाचा अनुभव शब्दात मांडणं कठीणच असते. रंगभूमी तुम्हाला या सिनेइण्डस्ट्रीत पाय भक्कम रोऊन उभं राहायला शिकवते. ज्याने रंगभूमीवर प्रेम केलं त्याला रंगदेवता कधी काहीच कमी पडू देत नाही असं म्हटलं जातं.
रंगभूमीवरचे प्रत्येकाचे अनुभव आणि विचार वेगळे. अभिनेता सुबोध भावेचेही रंगमंचावरचे असेच काही वेगळे मत आहे. सुबोध म्हणतो की, ‘आयुष्यात तुम्ही कोणत्याही स्टेजला जा, पण ज्या स्टेजमुळे तुम्ही उभे आहात त्या स्टेजचे स्मरण आणि नमन करायला विसरु नका.’
सुबोधचा हा विचार फक्त रंगमंचावर काम करणाऱ्यांसाठीच लागू पडतो असं नाही. तर नित्याचे जीवन जगतानाही ज्या परिस्थितीतून आपण आलो आहोत त्याचा विसर पडू नये. सुबोधने त्याचा रंगमंचावरचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला. त्याच्या या संदेशाचे अनेकांनी कौतूक केले  आहे. दरम्यान, सुबोध त्याच्या आगामी ‘फुगे’ या चित्रपटाद्वारे चाहत्यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसेल. या चित्रपटात  स्वप्निल जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्याही भूमिका असून स्वप्ना वाघमारे जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.