बॉलीवूडमध्ये आपल्या स्वत:च्या स्वतंत्र नृत्यशैलीचा ठसा उमटविलेले दिवंगत अभिनेते भगवानदादा यांच्या जीवनावरील ‘एक अलबेला’ या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. अभिनेता मंगेश देसाई या चित्रपटात भगवानदादांची भूमिका करतो आहे. तर गीता बालींच्या भूमिकेत विद्या बालन दिसणार आहे.  टिझरमध्ये मंगेश देसाई भगवानदादांच्या प्रसिद्ध नृत्याच्या स्टेप्स करतानाही दिसतो.  त्यामुळे या चित्रपटाबदद्लची प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

या चित्रपटातील विद्या बालनचा लूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. विद्याच्या चेहऱ्यात निखळ गोडवा, निरागसपणा आणि सुंदरतेचे एक अजब मिश्रण आहे. योगायोगाने अभिनेत्री गीता बाली यांचाही चेहरा तसाच होता. विद्याच्या या लुकसाठी मेकअपमन विद्याधर भट्टे यांनी कमालीची मेहनत घेतली, तर विद्याचे कपडे हे त्या काळातील कपडय़ांप्रमाणे अनुरूप असावेत, यासाठी रंग-कपडय़ाचा पोत या सगळ्याचा बारकाईने विचार करून तिचे कपडे डिझाइन करण्यासाठी स्टायलिस्ट सुबर्णा राय चौधरी यांनी तितकाच वेळ देऊन काम केले होते.

काही दिवसांपूर्वीच मंगेश देसाई आणि विद्या बालन यांच्यावर ‘शाम ढले खिडकी तले’ या गाण्याचे काही चित्रीकरण तसेच अन्य काही दृश्यांचे चित्रीकरण मुंबईतील गोरेगाव चित्रनगरीत करण्यात आले होते.

विद्याचा ‘अलबेला’ लुक!
विद्या बालनचा ‘मराठी’ सुसंवाद