कल्पनाच कशी भन्नाट आहे बघा, रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’मधील गब्बरसिंग आपल्या गुन्ह्याची शिक्षा पूर्ण करून जेलबाहेर पडतोय तोच चार ड्युप्लीकेट हीरो आपल्या पूर्वनियोजित कटानुसार त्यालाच पळवतात. ‘रामगढ के शोले’ (१९९१) या विडंबनात्मक चित्रपटाची ही मध्यवर्ती कल्पना. या चित्रपटाच्या मुहूर्ताला हजर राहिल्यापासूनच हा नेमका प्रकार काय बरे आहे वा असावा याचे विलक्षण कुतूहल वाढले. दिग्दर्शक अजित देवानी मात्र इतकेच म्हणाला, ‘आंधी’, ‘तुफान’ इत्यादी ‘शोले’च्या रिमेक फसल्या. मूळ ‘शोले’ची लोकप्रियता कायम आहे. गब्बरसिंग तर खेड्यापाड्यात पोहचलाय. त्यावर काही गंमत करावी म्हणूनच हा चित्रपट.

दिग्दर्शकाने कल्पनेनुसार चार ड्युप्लीकेट हीरो निवडले. त्यातील विजय सक्सेना ( अमिताभ बच्चन), किशोर भानुशाली ( देव आनंद) हे दोघे इतर काही चित्रपटातून नक्कल करूनही नावारूपास येत होते. म्हणजेच ते या चित्रपटासाठी फिट होतेच. जोडीला आनंद कुमार ( अनिल कपूर) व नवीन राठोड ( गोविंदा) याना निवडले. अमजद खानने या भन्नाट चित्रपटासाठी होकार दिला हे विशेषच. गंमत म्हणजे चित्रपट वेळेत पूर्ण झालादेखील. बहुतेक अमजदला हलका फुलका अनुभव घ्यायची इच्छा असेल. याशिवाय चित्रपटात धमाल करायला राजेंद्रनाथ, ज्युनियर मेहमूद, मनमौजी ( हवालदार दांडेकर), हरिश पटेल, दिनेश हिंगू होतेच.

चौघे ड्युप्लीकेट गब्बरसिंगला घेऊन विविध ठिकाणांहून कसे पळतात यावरचा गडबड गोंधळ म्हणजेच हा चित्रपट होता. अर्थात त्यात कसलीही तर्कसंगती नव्हतीच आणि तशी अपेक्षा ठेवणेही योग्य नव्हतेच. आणखीन एक विशेष, ‘शोले’ आणि मिनर्व्हा थिएटर हे नाते सुपरिचित आहे. तेच मिनर्व्हा ‘रामगढ के शोले’चे मुख्य चित्रपटगृह होते आणि या चित्रपटाने चक्क चार आठवड्याचे यशही मिळवले.
‘शोले’ची भकंस करुनही यश मिळवले यात मूळ चित्रपटाचे मोठेपणच स्पष्ट होतेय. ‘शोले’चा कुठे विषय निघालाच तर ‘रामगढ के शोले’देखिल आठवतो तर मग आणखीन काय हवे?
दिलीप ठाकूर