आजच्या महिला चित्रपट सृष्टीत विविध भूमिका बजावत आहेत. ही गोष्ट देशातील महिला सक्षमीकरणाची द्योतक आहे, असे मत अभिनेत्री कंगणा रणौतने व्यक्त केले आहे. ‘मी १० वर्षांपूर्वी जेव्हा कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा महिला संकलक आणि सहाय्यक दिग्दर्शिकांची संख्या खूप कमी होती. मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाही’, असे निरीक्षण कंगनाने नोंदवले आहे.

‘१० वर्षांपूर्वी जेव्हा मी चित्रपट सृष्टीत आले, तेव्हा या क्षेत्रात खूपच कमी महिला संकलक आणि सहाय्यक दिग्दर्शिका होत्या. मात्र आता जर तुम्ही चित्रपटाच्या सेटवर गेलात, तर हे क्षेत्र महिलांनी काबीज केल्याचे दिसेल. या महिलांच्या प्रेरणेमधूनच महिलांच्या सक्षमीकरणास मदत होते’, असे कंगनाने रिबॉकच्या फ्लॅगशिप फिटहबच्या स्टोरच्या उद्घाटनावेळी म्हटले.

मनोरंजन साधनांच्या ग्राहक म्हणून देखील महिलांचे महत्त्व गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने वाढले आहे. यावेळी तोकडे कपडे घालणाऱ्या महिलांकडे पाहण्याची लोकांची मानसिकता बदलली आहे का, असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. यावर ‘एखादी व्यक्ती आपल्या मुलीला मुलापेक्षा वेगळी वागणूक देत असेल किंवा महिलेच्या स्कर्टच्या लांबीवरुन तिचे चारित्र्य ठरवत असेल, तर अशा व्यक्तीने आपण महिलांना कोणत्या पद्धतीने जोखत आहोत, याचा विचार करायला हवा,’ असे मत कंगनाने व्यक्त केले.

कंगना आता विशाल भारद्वाज यांच्या रंगून चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि सैफ अली खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.