कितीही आणि कोणत्याही प्रकारचे प्रश्न असो, त्यांची उत्तरं देताना गुगल मात्र कधीही थकत नाही. म्हणूनच ‘गुगल से बचके कहा जाओगे’ असं अनेकदा म्हटलं जातं. गेली कित्येक वर्ष असंख्य प्रश्नांना अविरतपणे उत्तरे देत आज गुगल चक्क १८ वर्षांचे झाले आहे. त्यामुळे ‘सेलिब्रेशन इज ऑन’ असं दर्शवणारं एक डुडल आजच्या दिवशी गुगलने तयार केले आहे.
अतिशय कलात्मकपणे साकारण्यात आलेल्या या डुडलमध्ये ‘जी’ हे अक्षर फुगा फुगवून त्यापासूनच पुढची अक्षरे साकारत आहेत. वाढदिसाच्या दिवशी पताका, फुगे, त्रिकोणी टोप्या हा असा जो काही घाट घातला जातो तो या एका डुडलमध्ये साकारण्यात आला आहे. तेव्हा आज गुगलला भेट देताना त्याला शुभेच्छा द्यायला विसरु नका.

विविध दिवसांचे महत्त्व जाणत गुगल नेहमीच काहीतरी वेगळ्या संकल्पनेसह तयार असतं. आजवर गुगलने नानाविध डुडल तयार केले आहेत. पण आजचे हे डुडल काही खास आहे. खुद्द गुगलनेच त्याच्या वाढदिवसाविषयीचे डुडल तयार केले असले तरीही या कंपनीच्या स्थापनेविषयीच्या तारखांमध्ये गोंधळच दिसत आहे. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी १९९८ मध्ये गुगलची सुरुवात केली. पण गुगल आजवर सहा विविध तारखांना वाढदिवस साजरा करत आले आहे. तारखा कोणत्याही असो, वार कोणताही असो गुगल म्हटलं की तो अनेकांच्याच जिव्हाळ्याचा विषय बनून जातो. त्यामुळे गुगलच्या वाढदिवसाची खरी तारीख शोधण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुर्तास त्याच्या या वाढदिवसात सहभागी होणंच उत्तम.