अनेक हॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करणा-या भारतीय कलाकार इरफान खानच्या कामाची स्तुती सर्वांकडूनचं केली जातेयं. पण या स्तुतीचा भारतात काम मिळवण्यासाठी अजिबात उपयोग होत नाही, असे अभिनेता इरफान खानचे म्हणणे आहे.
‘अ माइटी हार्ट’, ‘द नेमसेक’, ‘स्लमडॉग मिलिनियर’, ‘द अमेझिंग स्पायडर मॅन’, ‘लाइफ ऑफ पाय’ आणि ‘ज्युरासिक पार्क’ या हॉलीवूड चित्रपटांनी इरफानने आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर काम करणारा अभिनेता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. पण याविषयी इरफानचे वेगळेच मत आहे. तो म्हणतो की, माझ्या हॉलीवूडमधील कामाचे येथील कामाशी काहीही देणेघेणे नाही. प्रत्येक देशातील प्रेक्षकवर्ग वेगळा असतो आणि नक्कीचं तो आमचा माणूस काम करतोय या आशेने त्याच्याकडे बघतो. हॉलीवूडमधील चित्रपटांमुळे तेथील प्रेक्षकांचा समज माझ्यासाठी वेगळा आहे. पण, भारतीय चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी तुम्हाला तेथील कामाचा काहीचं उपयोग होत नाही. ‘तलवार’ आणि ‘जजबा’ चित्रपटाच्या यशाने आनंदी असलेल्या इरफानच्या मते हॉलीवूड चित्रपटकर्त्यांचा भारतीय कलाकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. भारतीय कथा, कौशल्य आणि तंत्रज्ञानासाठी आंतरराष्ट्रीय मार्केटचे दरवाजे खुले झाले आहेत. भारतीय कलाकारांना परराष्ट्रात काम करताना पाहून खूप आनंद होतो. ‘कॉन्टिको’ या अमेरिकन मालिकेत काम करत असलेल्या प्रियांका चोप्रासाठी मी खूश आहे, असेही यावेळी इरफान म्हणाला.