हॉलिवूडचे आणखी एक कपल लवकरच घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ पाडणारा मॅचो मॅन जॉर्ज क्लूनी आणि मानवी हक्कासंबंधी लढणारी वकील अमाल अलमुद्दीन लवकरच एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. परंतु हा घटस्फोट जॉर्जला चांगलाच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. अमालला जॉर्जकडून तब्बल ३०० मिलियन डॉलर पोटगीत मिळणार आहेत.
जॉर्ज आणि अमाल गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहत असून घटस्फोट देण्याविषयी गंभीर विचार करत असल्याचे वृत्त ओके नावाच्या एका साप्ताहिकाने दिले आहे. दोघे अजूनही एकमेकांवर प्रेम करतात. पण गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये तणावाचे वातावरण असून याचा त्यांच्या नात्यावर परिणाम पडत असल्याचेही त्यात म्हटले आहे.

अमालला मुलं हवी आहेत. पण जॉर्ज त्यासाठी अद्याप तयार नाही. घटस्फोटाचे हेही एक महत्वाचे कारण असल्याचे ओके साप्ताहिकाने म्हटले आहे. अमालच्या या मागणीमुळे जॉर्ज तणावात तर अमाल ही प्रचंड दु:खी आहे. जॉर्ज आणि अमालचा २०१४ मध्ये विवाह झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूडमध्ये सेलिब्रेटिंचे घटस्फोट होताना दिसत आहे. जॉनी डेम्प-एंबर हर्ड आणि ब्रॅड पीट-अँजेलिना जोली यांनी नुकताच घटस्फोट घेतला आहे. आता या यादीत जॉर्ज क्लूनी-अमाल यांचा समावेश झाला आहे.
हा घटस्फोट झाल्यास हा हॉलिवूडमधील महागडा घटस्फोट ठरेल. ३०० मिलियन डॉलरबरोबर अमालला जॉर्जचा राजमहलासारखा असलेला लेक कोमो व्हिला हा बंगलाही मिळू शकतो.