बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणजेच हृतिक रोशन हा डिझायनर विक्रम फडणीसच्या ‘हृदयांतर’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस ‘हृदयांतर’ या चित्रपटाद्वारे लेखक-दिग्दर्शक-निर्माता अशा तिहेरी भूमिकेत दिसणार आहे.

विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट निर्मित ‘हृदयांतर’चा ट्रेलर येत्या २८ मेला प्रदर्शित होणार आहे. स्वतः हृतिक रोशन हा ट्रेलर लाँच करणार आहे. हृतिकसोबतच चित्रपटातील मुख्य कलाकार असलेले सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे हेदेखील यावेळी उपस्थित राहतील. जोशी कुटुंबाच्या या कथेमध्ये सौ. समायरा जोशीच्या भूमिकेत मुक्ता बर्वे तर श्री. शेखर जोशीच्या भूमिकेत सुबोध भावे दिसणार आहे. ‘एक डाव धोबी पछाड’ या चित्रपटानंतर मुक्ता-सुबोध तब्बल नऊ वर्षांनी एकत्र झळकणार आहेत.

विक्रमने हृतिकला ट्रेलर लाँचविषयी विचारले तेव्हा तो खूप खूश झाला. या दोघांमध्येही घट्ट मैत्री असून चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी हृतिक नेहमीच विक्रमच्या पाठीशी उभा होता. काही दिवसांपूर्वी हृतिकने ट्विट केलेले की, ‘हृदयांतर’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना मला आनंद होत आहे. या चित्रपटाचा एक भाग असल्याने मी खूप उत्सुक आहे. या चिपपटाचे दिग्दर्शन माझा मित्र विक्रम फडणीसने केलेय.

‘हृदयांतर’आधी ९ जूनला प्रदर्शित होणार होता. पण, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून ७ जुलै करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/BT6Fc_dDHyF/