सध्या सर्वत्र ‘बाहुबली २’ या चित्रपटाचीच चर्चा आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारे प्रभास, राणा डग्गुबती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी आणि कला दिग्दर्शक साबू सिरील हे ‘बाहुबली- द कन्क्लूजन’च्या प्रसिद्धीसाठी रविवारी कोची येथे गेले होते. मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली, निर्माता शोबु यर्लागड्डा आणि प्रसाद देवीनेनी यावेळी उपस्थित नव्हते.

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान प्रभासवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. त्यापैकी कमाल आर खानने प्रभासबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दलही विचारण्यात आले. महाभारतावर बनणाऱ्या चित्रपटामध्ये भीमाच्या भूमिकेसाठी अभिनेता मोहनलालऐवजी प्रभास योग्य असल्याचे त्याने म्हटले होते. यावर प्रभासचे मत त्याला विचारण्यात आले असता तो म्हणाला, मोहनलाल सर ती भूमिका (भीम) साकारत आहेत. त्यांनी जर मला चित्रपटात एखादी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी दिली तर मी नक्कीच त्या चित्रपटात काम करेन. मोहनलाल आणि प्रभास यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे हे दोघांच्याही चाहत्यांसाठी नक्कीच औत्सुक्याचे ठरेल.

[jwplayer EgmlUHgT]

काही दिवसांपूर्वीच कमाल आर खानने अभिनेता मोहनलाल यांची खिल्ली उडवली होती. तसेच, वासुदेवन नायर यांच्या ‘रंदमूझम’वर आधारित चित्रपटात प्रभासनेच भीमाची व्यक्तिरेखा साकारावी असे म्हटले होते. मात्र, मोहनलाल यांच्या चाहत्यांनी केआरकेची उलट फिरकी घेतल्यानंतर त्याने त्यांची माफी मागितली.

महाभारतावर बनणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) अरबपती बी आर शेट्टी तब्बल १००० कोटींची गुंतवणूक करणार आहेत. पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, २०२० च्या सुरुवातीला चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. दोन भागांत बनणाऱ्या या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आल्यानंतर ९० दिवसांनी दुसरा भाग प्रदर्शित करण्यात येईल. तसेच, हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगु आणि प्रमुख परदेशी भाषांमध्ये बनविला जाईल.

[jwplayer 9HbIieXn]