‘हॅपी भाग जाएगी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली नसली तरी प्रेक्षक व समीक्षकांनी मात्र सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रेक्षकांच्या याच सकारात्मक प्रतिसादामुळे ‘हॅपी भाग जाएगी’चे निर्माते आनंद एल राय सध्या भलतेच खुश आहेत. त्यांचा ‘हॅपी भाग जाएगी’चा सिक्वल काढण्याच्या विचारात ते आहेत.
नावडत्या मुलाशी लग्न करण्यापेक्षा पळून जाण्याचा मार्ग योग्य वाटणा-या हॅपीची ही कथा आहे. विषय जरी नेहमीचाच वाटत असला तरी दिग्दर्शकाने यात थोडा ट्विस्ट आणला आहे आणि तोच तुम्हाला पूर्ण ट्रेलर पाहण्यास भाग पाडतो. पंजाबमधून आपल्या लग्नाच्या दिवशी पळालेली हॅपी नकळतपणे चक्क पाकिस्तानमध्ये जाऊन पोहचते. त्यानंतर तिच्यामुळे पाकिस्तानमधील एका कुटुंबाची उडालेली तारांबळ आणि डायनाचा पंजाबी रुबाब यात पाहावयास मिळतो. जिमी शेरगिलशी लग्न न करण्याच्या इराद्याने हॅपी पंजाबामधून पळते आणि पाकिस्तानात अभय देओल याच्यापाशी येऊन तिचा शोध संपतो. घरी परतते तेव्हा तिचा आणखी एक प्रेमी म्हणजे अली फजल तिची वाट पाहत असतो. पण हॅपी काही वेगळेच ठरवून आलेली असते. अशा आशयाचा हॅपी भाग जाएगी हा सिनेमा होता.
‘कॉकटेल’ सिनेमाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा-या डायनाने ‘हॅपी भाग जाएगी’ सिनेमासाठी खूप मेहनत घेतल्याचे समजते. सिनेमातील तिची व्यक्तिरेखा मजेशीर तर होतीच शिवाय यात ती कठीण प्रसंगात काहीना काही मार्ग काढणारी सामान्य पण स्वावलंबी मुलगी दाखवण्यात आली होती.
विनोदीपट असलेल्या या सिनेमातले अभय देओल, डायना पेंटी, मोमल शेख, अली फजल, जिमी शेरगील, पियुष मिश्रा या सर्वांचे काम प्रेक्षकांना पसंत पडले. सिनेमाचे संगीतही अनेकांना आवडले. सिनेमाचे दिग्दर्शक मुद्दसर अजीज व निर्मात सगळी टीम यामुळे आनंदीत आहे. त्यामुळेच या सिनेमाचा सिक्वल बनवण्याचा त्यांचा विचार आहे. सूत्रांच्या मते, मुदस्सर अजीज यांच्याकडे सिक्वलसाठी आणखीही चांगल्या कल्पना आहेत. तेव्हा बघूयात ‘हॅपी भाग जाएगी’ चा सिक्वल कधी येतोय ते…