dilip thakurसलमानच्या वागण्याबोलण्यावर सलिम खान तर एकाद्या सामाजिक राजकीय घडामोडीवर जावेद अख्तर आपापल्या पध्दतीने प्रतिक्रिया देतात वा ट्वीट करतात. आपला असा स्वतंत्र बाणा जपणारे हे दोघे एकेकाळी चक्क एकत्र काम करत होते. सलिम खान खरं तर अभिनय करायचे. विजय आनंद दिग्दर्शित तिसरी मंजील मध्ये शम्मी कपूर वो हसिना जुलफोंवाली नाचत असताना सलिम आपल्याला ड्रम वाजवताना दिसतो.  जावेदशी त्यांची पटकथा संवाद लेखनात जोडी जमली आणि बरेच काही घडले. पूर्वीचे चित्रपट पाहताना त्यात अनेकदा स्टोरी डिपार्टमेंट असे श्रेयनामावलीत वाचायला मिळते. सलिम-जावेद जोडीने पटकथा-संवाद लेखनाला प्रतिष्ठा व मूल्य दिले. ‘जंजीर’ने त्याना नावारुपाला आणले. पण त्याच ‘जंजीर’च्या मोठ्या पोस्टरवर आपले नाव नाही हे पाहून त्यानीच ते त्यावर टाकल्याचा किस्सा आजही सांगितला जातो. ‘जंजीर’ने ..विशेष करून जावेदने आपल्याला सूडनायक प्रतिमा दिल्याचे अमिताभ कायम सांगतो. ‘दीवार’ ‘शोले’, ‘त्रिशूल’, ‘शान’, ‘दोस्ताना’, ‘डॉन’, ‘शक्ती’ इत्यादी… चित्रपटांमधूनची त्यांच्या यशस्वी कारकिर्दीची घौडदौड अचंबित करणारी होती. मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्याशी त्यांचा पटकथा लेखक महत्वाचा की दिग्दर्शक असा वादही झाला. दुर्दैवाने या जोडीचा ‘इमान धरम’ फ्लॉप ठरल्याने मनजी सरस ठरले. राजेश खन्नाशी वाद झाल्याने या जोडीने ‘हमशकल’ व ‘भोला भाला’ या चित्रपटत पटकथाकार म्हणून नाव न देण्याचे ठरवले. चित्रपटसृष्टीत इतरही गोष्टीत गाजणारी ही भक्कम जोडी फुटली. जावेदने गीतलेखनाकडे मोर्चा वळवला म्हणून ही जोडी फुटली की शबाना आझमीने जावेदला स्वतंत्रपणे लेखनाचा सल्ला दिल्याने ही जोडी फुटली यावर बराच काळ चर्चा रंगत राहिली. त्यात हे दोघे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता मात्र मावळत गेली.
दिलीप ठाकूर