जिया खान आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून योग्य प्रकारे तपास होत नसल्याने जियाची आई रबिया खानने अमेरिकेच्या ‘एफबीआय’ संस्थेची मदत मागितली होती. जिया ही अमेरिकी नागरिक असल्याने ‘एफबीआय’ने तिच्या मृत्यूप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी रबिया यांनी ‘एफबीआय’कडे केली होती. यानंतर  जिया खान मृत्यूप्रकरणातील तपासात मुंबई पोलिसांना सहकार्य करण्याची इच्छा अमेरिकी सरकारने दर्शवली असून, याबाबतचे एक पत्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला सोमवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळाले.
मागील वर्षी ३ जून रोजी जिया खान जुहू येथील तिच्या निवासस्थानी गळफास लावलेल्या स्थितीत आढळली होती. या प्रकरणी सहकार्य करण्याबाबतचे एक पत्र अमेरिकी सरकारतर्फे सीबीआयला मागील आठवड्यात पाठविण्यात आले होते. सदर पत्र सीबीआयने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे पाठवले असून, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) निकेत कौशिक यांनी याला दुजोरा दिला आहे. अमेरिकी सरकारने सदिच्छेच्या हेतूने सहकार्य करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. ही एक सर्वसाधारण बाब आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसच मूळ शोधकर्ता असतील. सहकार्याची आवश्यकता भासल्यास अमेरिकी सरकारला कळविण्यात येणार असल्याचे एक पोलीस अधिकारी म्हणाला.
दरम्यान, याप्रकरणी योग्य प्रकारे शोध न करता जियाने आत्महत्या केल्याचा दावा करत पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्याने आठवड्याभरात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे रबिया खान म्हणाल्या. जियाच्या रक्ताचे नमुने दोन खोल्यांमधून मिळाल्याचा दावा रबिया खान यांनी केला आहे. जर जियाने आत्महत्या केली, तर तिच्या रक्ताचे नमुने दुसऱ्या खोलीतदेखील कसे आढळून आले? पोलिसांनी याबाबत आरोपपत्रात काहीही खुलासा केला नसल्याचे रबिया खानचे वकील दिनेश तिवारी म्हणाले. दोन्ही खोल्यांमध्ये सापडलेले रक्ताचे नमुने हे जिया खानचेच असल्याचे फॉरेन्सिक अहवालात म्हटले आहे. याविषयी बोलताना रबिया म्हणाल्या, जियाचा कोणी खून केला आला आहे का हे मला शोधायचे असून, पोलिसांनी याबाबत योग्य प्रकारे शोध करणे गरजेचे आहे.