आजच्या आघाडीच्या मराठी अभिनेत्रींमध्ये नम्रता गायकवाड हे नाव आवर्जून घ्यावे लागेल. ‘मंगळसूत्र’ या मालिकेमधील प्रमुख भूमिका असो की ‘वंशवेल’ या चित्रपटातील भूमिका असो नम्रता गायकवाडने थोडय़ाच चित्रपट-मालिका-नाटकांतून विविध छटांच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे’ याद्वारे नम्रताने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. नंतर ‘कॅम्पस कट्टा’ या चित्रपटातूनही तिने प्रमुख भूमिका साकारली होती. नजीकच्या काळात ‘झरी’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत नम्रता दिसणार असून सध्या ‘तपस्या’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात ती व्यस्त आहे. या चित्रपटात जिल्हाधिकारी महिलेच्या भूमिकेत ती झळकणार आहे. नाटकापासून सुरुवात झाली असली तरी मधल्या काळात आपल्याला नाटक करायची इच्छा असूनही वेळ मिळालेला नाही. लवकरच एका हिंदी नाटकाद्वारे आपण नाटय़रसिकांसमोर येणार असल्याचे ती म्हणाली.

’आवडते मराठी चित्रपट- ‘फँड्री’, ‘इन्व्हेस्टमेंट’.
’आवडते हिंदी चित्रपट- ‘लाइफ इन ए मेट्रो’, ‘ए वेन्सडे’.
’आवडती नाटकं- ‘बॅरिस्टर’, ‘सखाराम बाईंडर’, ‘छापा काटा’, ‘लुकाछुपी’.
’आवडते अभिनेते- हृतिक रोशन, रितेश देशमुख.
’आवडत्या अभिनेत्री- स्मिता पाटील, कंगना राणावत.
’आवडते दिग्दर्शक- राजीव पाटील, निशिकांत कामत.
’आवडते लेखक- आचार्य अत्रे, रत्नाकर मतकरी, स्वप्निल गांगुर्डे, दत्ता पाटील.
’आवडलेल्या भूमिका- ‘क्वीन’मधील कंगना राणावतची भूमिका, ‘खुदा गवाह’मधील श्रीदेवीची भूमिका, ‘जोश’मधील ऐश्वर्या रायची बिनधास्त भूमिका.
’आवडते सहकलावंत- किशोर कदम, मिलिंद शिंदे, विक्रम गोखले. या कलावंतांकडून खूप शिकायला मिळाले, नेहमीच मिळते. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे किशोर कदम सेटवर असताना कविता ऐकवतात, त्यांच्याशी कवितांबाबत खूप बोलणं होतं. तसेच मिलिंद शिंदे बरोबर असताना आम्ही गाणी गातो. सेटवर धमाल करतो. त्यातूनही खूप काही मिळतं.
’आवडता खाद्यपदार्थ- कोणत्याही प्रकारची कोळंबी.
’आवडता फूडजॉईण्ट- कल्याणमधील गणेश घाटाजवळील पाणीपुरी स्टॉल, ठाण्यातील तलावपाळीवर मिळणाऱ्या निरनिराळ्या पदार्थाच्या गाडय़ांवरील खाद्यपदार्थ.
’आवडतं हॉटेल- कल्याण पश्चिम येथील खडकपाडा परिसरातील ‘कोकणरत्न’. मालवणी सूप, बोंबिल खाण्यासाठी हे हॉटेल आवडते.
’कल्याणविषयी थोडेसे- लहानपणापासून कल्याण पूर्व परिसरात राहात असल्यामुळे बरेच मित्र-मैत्रिणी, शेजारीपाजारी, कॉलनीतील लोक यांच्याशी नाते जुळून गेले. नालंदा हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण तर बिर्ला कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. त्यामुळे अर्थातच कल्याण परिसरात माझ्या बॅचमधल्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप आहे. सध्या कल्याणमध्ये राहात नसले तरी करिअरच्या सुरुवातीला म्हणजे अलका कुबल यांनी माझी मालिकेसाठी निवड केली तेव्हा कल्याणमध्ये राहूनच थेट मढ आयलण्ड येथे मालिकेच्या चित्रीकरणासाठी सकाळी सात वाजता पोहोचायचे. कल्याणसारख्या छोटय़ा शहरातून माझ्यासारखी एक अभिनेत्री सिनेमा-नाटक-मालिकांमध्ये आघाडीची अभिनेत्री बनू शकले याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याचबरोबर कल्याणमधील लोकांनाही याचे अप्रूप आजही वाटते. म्हणूनच ‘वंशवेल’ या सिनेमातील माझी भूमिका पाहण्यासाठी समस्त कल्याणकरांनी चित्रपटगृहात गर्दी करून हाऊसफुल्लचा बोर्ड लावला होता. कल्याणमधील लोकांविषयी मला निश्चितच आपुलकी वाटते. आपण लहानाचे मोठे झालो त्या परिसरातील लोकांविषयी, त्या परिसराविषयी आपलेपणा वाटणे हेही स्वाभाविकच आहे. तरीसुद्धा आजही कल्याणमध्ये कोणतेही कार्यक्रम असले तरी कल्याणकर मला आवर्जून हक्काने आमंत्रण करतात आणि कल्याण हे माझे घरच आहे असे मी मानते. त्यामुळे माझ्या घरातील लोकांनी बोलावल्यामुळे मीही तितक्याच हक्काने जाते. माझ्या पहिल्या सिनेमाच्या वेळी कल्याणमधील असंख्य लोकांनी माझ्यावर शुभेच्छा, पुष्पगुच्छांचा वर्षांव केला होता ही गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही.
शब्दांकन-
सुनील नांदगावकर

नम्रता गायकवाड