‘घरबसल्या श्रीमंत होण्याचा काही मार्ग आहे कारे भाऊ….?’ असा प्रश्न विचारणारी एकतरी व्यक्ती आपल्याला भेटते. त्या व्यक्तीचा हा असा प्रश्न आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर देताना आपली उडालेली तारांबळच सर्वकाही सांगून जाते. कारण, घरबसल्या पैसे कमवणं हे काही सोपं काम नाही, अशाच मतावर आपण आणि आपल्यासारखे अनेकजण ठाम आहेत. पण, खरंच अशी संधी तुम्हाला कोणी दिली तर.., ‘घरबसल्या कोण आपल्याला पैसे देणार असा प्रश्न..?’ असा प्रश्न तुमच्या मनात घर करत असेल तर त्याचं उत्तर आहे कमाल रशिद खान.

नेहमीच वादग्रस्त ट्विट करणारा आणि सेलिब्रिटींवर निशाणा साधत वायफळ टिवटिव करणारा स्वघोषित चित्रपट समीक्षक कमाल रशिद खान याने घरबसल्या पैसे कमवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे. केआरकेने एक ट्विट करत नेटिझन्सना ही संधी देऊ केली आहे. ‘जो कोणी मला ट्विटरवर फॉलो करेल त्यांच्या खात्यामध्ये १ जूनपर्यंत पाच लाख रुपये पोहोचतील… या संधीसाठी आता शेवटचे आठच दिवस उरले आहेत.’ असं ट्विट केआरकेने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या बरंच चर्चेत असून अनेकांनी त्याची खिल्लीही उडवली आहे.

हे असं ट्विट करण्यामागे त्याचा नेमका काय उद्देश आहे, हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरीही केआरके नेहमीप्रमाणेच नेटिझन्सची दिशाभूल करत आहे, असं मत बऱ्याचजणांनी मांडलंय. इतकच नव्हे तर ट्विटरवर फॉलोअर्सचा आकडा वाढवण्यासाठी केआरकेने हा नवा मार्ग निवडला असल्याचंही म्हटलं जात आहे. सध्याच्या घडीला ट्विटरवर त्याचे ३९ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. कोणत्याही चित्रपटाबद्दल रिव्ह्यू देताना शब्द आणि भाषेची मर्यादा न राखता केआरके नेहमीच बॉलिवूड सेलिब्रिटींना निशाणा करत असतो. त्यामुळे त्याचे बऱ्याच सेलिब्रिटींसोबत खटके उडत असतात. काही दिवसांपूर्वी त्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत त्यांच्यावर उपरोधिकपणे टीका केली होती.

वाचा: केआरकेकडून मोदींना उपरोधिक टोले