हॉलीवूड, बॉलीवूड असो वा मराठी चित्रपटसृष्टी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी काय काय केले जाईल याचा नेम नसतो. त्यात जर तो चित्रपट एखाद्या व्यक्तिच्या जीवनावर आधारित असेल तर मग त्या व्यक्तिच्या आयुष्यातील अगदी छोटीशी गोष्टही सोडली जात नाही. आता हेच बघा ना भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात महेंद्रसिंग धोनीचे बालपणापासून ते आतापर्यंतचे संपूर्ण आयुष्य केंद्रित करण्यात आलेय. त्याचसोबत त्याची आधीची गर्लफ्रेण्ड, पत्नी यांच्याही व्यक्तिरेखा चित्रपटात पाहावयास मिळणार आहेत.
धोनीचा जीवनप्रवास आपल्याला यात पाहायला मिळेल. त्याचसोबत त्याचे खासगी आयुष्यातील काही क्षणही रुपेरी पडद्यावर दिसतील. विशेष म्हणजे धोनीचे आणि साक्षीचे लग्न झाले तो क्षणही चित्रपटात दाखविण्यात येईल. महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी यांनी २०१० साली एका खासगी समारोहात देहरादून येथे लग्न केले होते. या लग्न सोहळ्याची सविस्तर माहिती फार कमी लोकांनाच असेल. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? पण तुम्हाला माहित आहे का.. चित्रपटात साक्षी धोनीची भूमिका अभिनेत्री कियारा अडवाणी साकारत आहे. लग्नाच्या दृश्यात ती हुबेहुब साक्षीसारखीच दिसावी याकरिता साक्षीने तिच्या लग्नात घातलेल्या लहेंग्याप्रमाणे अगदी तसाच लहेंगा कियारासाठी तयार करण्यात आला. हा पोशाख तयार करून घेण्यासाठी खुद्द साक्षी धोनीच स्वतः कियाराला तिच्या डिझाइनरकडे घेऊन गेली. इतकेच नाही तर साक्षीने लग्नात केलेला मेकअप आणि तिने घातलेले दागिनेही हुबेहुब कियारासाठी तयार करण्यात आले. आता साक्षीने लग्नात काय पोशाख केला होता हे महत्त्वाचे आहे की धोनीचा प्रवास महत्त्वाचा? असो. चित्रपटात अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा धोनीच्या मुख्य भूमिकेत दिसेल. त्याने धोनीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी बरेच कष्ट घेतल्याचे म्हटले जातेय. तर दिशा पटानी ही धोनीच्या मृत पावलेल्या प्रेयसीची भूमिका साकारत आहे.
‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट येत्या ३० सप्टेंबरला प्रदर्शित होईल. या चित्रपटाबाबत धोनीच्या चाहत्यांना बरीच उत्सुकता आहे.