चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बरेच कलाकार हल्ली टेलिव्हिजन कार्यक्रमांचा आधार घेतात. टिव्ही शोसारख्या भक्कम माध्यमाची जोड देत चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बरेच नवनवीन फंडे आज अंमलात आणले जात आहेत. त्याचाच एक मुख्य भाग म्हणजे विनोदी कार्यक्रम. मराठीत ‘चला हवा येऊ द्या’ आणि हिंदीत ‘द कपिल शर्मा शो’ या दोन कार्यक्रमांची लोकप्रियता पाहता आजवर बऱ्याच मोठ्या चित्रपटांचं या कार्यक्रमांमध्ये प्रमोशन करण्यात आलंय. मुख्य म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हिंदी आणि ‘द कपिल शर्मा शो’मध्ये मराठी चित्रपटांचं प्रमोशन, असं आगळंवेगळं समीकरण या कार्यक्रमांतून पाहायला मिळालं आहे.

कपिलच्या शो मध्ये नुकतीच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एफयू- फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली होती. ‘एफयू’मधील कलाकार, मेधा मांजरेकर, महेश मांजरेकर आणि इशा कोपिकर यांनीही या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. ‘द कपिल शर्मा शो’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या धमाल भागाचे काही फोटोसुद्धा पोस्ट करण्यात आले आहेत. यातून कपिल शर्मा शोमध्ये गेलेल्या या चित्रपटाच्या टीमने एकच कल्ला केल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी मांजरेकर आणि त्यांचं कुटुंब चित्रपटाचाच भाग असल्याचा मुद्दा हेरत कपिलने पैसे वाचवण्यासाठी मांजरेकरांनी हा मार्ग अवलंबल्याचं म्हणत विनोदी चौकारच मारला. ‘एफयू’चं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. विविध कार्यक्रम, रेडिओ शो अशा बऱ्याच मार्गांनी प्रमोशनसाठी शकला लढवल्या जात असल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, ‘सैराट’ या चित्रपटापासून मराठी चित्रपटांचं हिंदी कार्यक्रमांमध्ये प्रमोशन केलं जाऊ लागलं. त्याआधीपासूनच ‘चला हवा येऊ द्या’मधून बऱ्याच हिंदी कलाकारांनी हजेरी लावत चित्रपटांचं प्रमोशन केलंय. भाषेच्या चौकटीत अडकून न राहता अवलंबलेला हा फंडा चित्रपटांच्या दृष्टीने फायद्याचाच ठरला आहे. त्यामुळे विविधभाषी प्रेक्षकवर्गही मराठी आणि हिंदी चित्रपटांकडे खेचला जात आहे. हिंदी कार्यक्रमांमध्ये होणारं मराठी चित्रपटांचं प्रमोशन पाहता कलाकारांना मिळणाऱ्या प्रसिद्धीतही वाढ होत असून त्यांच्या चाहत्यांच्या आकड्यातही वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रमोशनच्या निमित्ताने हे बदलते फंडे २ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘एफयू’ला कितपत फायद्याचे ठरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा: BLOG : मराठी चित्रपट तारुण्यात आलाय… हे पटतंय ना?

‘झी स्टुडिओ’सोबत झालेल्या वादानंतर मांजरेकरांच्या ‘एफयू’चा मोर्चा कपिलच्या शोकडे वळल्याचं पाहायला मिळालं. तर, ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटाच्या टीमने ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर दणक्यात प्रमोशन केलं. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची दाद मिळते हे जाणून घेण्याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा: Fu Marathi Movie: मांजरेकरांच्या ‘एफयू’ला ‘झी’चा ‘धडा’