‘टाइमप्लीज’, ‘डबलसीट’, ‘वाय झेड’ चित्रपटांचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी आपली एक वेगळी ओळख मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. त्यांचेच दिग्दर्शन असलेल्या ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता गश्मीर महाजनी ही नवी जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांपुढे येणार आहे. हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्या निमित्ताने दिग्दर्शक समीर विद्वांस आणि स्पृहा व गश्मीर जोडीसह चित्रपटातील विजय निकम, विनोद लव्हेकर, कमलेश सावंत यांनी नुकतीच ‘लोकसत्ता’ कार्यालयास भेट दिली. त्या गप्पांचा वृत्तान्त..

‘मानवी नातेसंबंधांचा शोध’

Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम

मानवी नातेसंबंध हे एक न उलगडणारे कोडे आहे. त्याचे कुतूहल शमत नाही आणि त्याचा थांगही लागत नाही. त्यामुळे मानवी नातेसंबंधांचा शोध हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. मी याआधी दिग्दर्शित केलेल्या ‘टाइमप्लीज’, ‘डबलसीट’, ‘वाय झेड’ आणि आगामी ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नात्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपली जीवनशैली आणि आयुष्य आज बदलून गेले असून आत्ताच्या पिढीपुढील आव्हानेही वेगळी आहेत. स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या युगात ही पिढी एखाद्या गोष्टीमागे धावत सुटते. या सगळ्यातून ते आर्थिक सुबत्ता आणि इतर बरेच काही मिळवतातही. पण हे सर्व मिळवताना त्यांना काही गमवावे लागते. हे गमावण्यात कुटुंब, त्यातील माणसे आणि त्यांचे आपापसातील नातेसंबंधही येतात. नातेसंबंधांवरील हे चित्र यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपण नेहमी समोरच्याकडे पाहतो, पण स्वत:कडे, कुटुंबाकडे पाहायला आपल्याला वेळ नसतो. काही प्रश्न किंवा अडचणी उद्भवल्या तर ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ म्हणत त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे आपण स्वत:लाच फसवत असतो. या लहान-सहान वाटणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष केले आणि वेळीच तोडगा काढला नाही तर तुटण्याचीच शक्यता जास्त असते. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपट म्हणजे आपण आपल्यातीलच स्वत:चा शोध घेणे आणि एका वळणावर थांबून एकमेकांशी संवाद सुरू करणे आहे. कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी मनमोकळा संवाद सुरू झाला तर सध्या भेडसावणारे अनेक प्रश्न सहज सुटतील. – समीर विद्वांस

मराठीला ‘प्राइम टाइम’हवाच!

एकाच दिवशी दोन-चार मराठी चित्रपट अधूनमधून प्रदर्शित होत असतात. त्यामुळे नेमका कोणता चित्रपट पाहायचा याबाबत प्रेक्षकांचीही द्विधा मन:स्थिती होते. प्रेक्षक वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विभागला जातो. यावर सन्मान्य तोडगा निघाला पाहिजे, असे मत समीर विद्धांस यांनी मांडले. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांची वेळ हा मोठा प्रश्न आहे. नियम केला म्हणून मल्टिप्लेक्स चालक १०० खेळ दाखविण्याचे लक्ष्य पूर्ण करतात. पण ते ज्या वेळेत मराठी चित्रपट दाखवतात ती प्रेक्षकांसाठी सोयीची असतेच असे नाही. त्यामुळे मराठी चित्रपटाला ‘प्राइम टाइम’ मिळालाच पाहिजे. राज्य शासनाने यात लक्ष घालून तोडगा काढावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आजच्या पिढीची गोष्ट

‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा चित्रपट म्हणजे आजच्या पिढीची गोष्ट आहे. प्रेमविवाह झालेल्या जोडप्याची ही कथा असून आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांच्यात काही प्रश्न निर्माण होतात. समोरासमोर बसून, एकमेकांना विश्वासात घेऊन आणि मनमोकळा संवाद साधून हे प्रश्न सुटू शकतात हे यात सांगितले आहे. तसेच आजच्या तरुण पिढीचे जीवन आणि प्रश्न यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.-स्पृहा जोशी

चित्रपटात प्रत्येकजण स्वत:ला बघेल

‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटात मी ‘अजय’ ही भूमिका साकारली आहे. चित्रपट पाहताना प्रत्येकजण यात स्वत:ला बघेल. प्रत्येकालाच आपले आयुष्य रटाळ किंवा नीरस वाटते, पण तसे नाही. तुम्ही रोजच्या जगण्यातील छोटय़ा-मोठय़ा गोष्टींमधून आनंद घेतला, कुटुंबातील नाती जपण्याचा प्रयत्न केला तर आहे ते आयुष्यही सुखी आणि आनंदी वाटेल. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे प्रतिबिंब ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटात पाहायला मिळेल. – गश्मीर महाजनी

आजच्या पिढीचा भ्रम

तुलना करत राहिलो तर सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपण यशस्वी होऊ असा भ्रम आजच्या तरुण पिढीने जोपासला आहे. ही तुलना मग ती कोणाशी आणि कोणत्याही प्रकारची असू दे, ती आपल्याला आयुष्यात कधीही सुखी राहू देत नाही. या पिढीत भविष्याची असुरक्षितता का येते? ती असुरक्षितता येते म्हणूनच सुरक्षिततेचा बाऊ केला जातो. – विजय निकम

एकमेकांचे ऐकू या

या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे. एकमेकांशी असलेला आपला  संवाद कमी झाला असून कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांचे ऐकून घेतले पाहिजे. पती आणि पत्नी या दोघांनी तसे केले नाही तर दोन ध्रुवांवर दोघे आपण.. अशी अवस्था पती-पत्नीत किंवा अन्य नात्यांमध्ये निर्माण होते. – विनोद लव्हेकर

कौटुंबिक नातेसंबंधावर प्रकाश

विजय निकम यांच्याबरोबर आधी काम केले होते. विनोद लव्हेकर यांच्याबरोबर पहिल्यांदा काम करतो आहे. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटातून कौटुंबिक नातेसंबंधावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नात्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा दूर करून कुटुंबाला एकत्र आणणे हे यात पाहायला मिळेल.  – कमलेश सावंत

(संकलन- शेखर जोशी

छायाचित्र- गणेश तेंडुलकर)