टेलिव्हिजन मालिका, नाटक आणि वेब सीरीजच्या विश्वातून प्रसिद्धी मिळालेला अभिनेता अमेय वाघ आणि वेबविश्वात सध्या चर्चेत असणारी ‘मीरा सेहगल’ म्हणजेच अभिनेत्री मिथिला पालकर ‘मुरांबा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर सध्या प्रदर्शित करण्यात आला असून, चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडिओमधील हा शेवटचा व्हिडिओ आहे, असं म्हणायला हरकत नाही.

तरुणाई, त्यांची प्रेमप्रकरणं आणि घरातल्या मंडळींचा या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन याचं एकंदर चित्रण या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. सत्तरच्या दशकातील फिल्मी आई, ‘आता बच्चन नका देऊ…’ असं म्हणणारा मुलगा, आई-वडिलांच्या वागण्यामुळे मुलांना होणारा अवघडलेपणा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. आपल्या प्रेमप्रकरणाचा सुगावा जेव्हा घरातल्या मंडळींना लागतो तेव्हा नेमकी काय मानसिक स्थिती असते अगदी त्याच पद्धतीचं चित्रण ‘मुरांबा’च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडची मराठी चित्रपटसृष्टीशी असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. आपल्या व्यग्र वेळापत्रातून वेळ काढत हे स्टार्स मराठी चित्रपटांची नेहमीच दखल घेताना दिसतात. प्रियांका चोप्रा, सलमान खान यांच्याबरोबरीने आता अजय देवगण देखील मराठी चित्रपटांमध्ये रस घेताना दिसत आहे. नुकतेच त्याने ‘मुरांबा’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करून नावाप्रमाणेच हा चित्रपटदेखील गोड आहे अशा अर्थाचे ट्विट करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

वरुण नार्वेकर दिग्दर्शित हा चित्रपट सध्या तरुणाईत चर्चेचा विषय ठरत आहे. अमेय वाघ आणि मिथिलाची केमिस्ट्रीसुद्धा या चित्रपटामध्ये पाहण्याजोगी असेल असं म्हणायला हरकत नाही. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात असून, नवीन शकला लढवत हा ‘मुरांबा’ प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेव्हा आता तरुणाईचा उत्साह आणि प्रौढांचा समजुतदारपणा यांचा समतोल राखणारा हा आंबटगोड ‘मुरांबा’ प्रेक्षकांना भावणार का, याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.