मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील एक सुप्रसिद्ध चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर आणि रंगभूमीवर शोकळला पसरली आहे. पुण्यातील भरत नाट्यमंदिरात ‘नाट्यत्रिविधा’ या नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच अश्विनी एकबोटे यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या या अकाली निधनाने चाहत्यांसह अनेक कलाकारांनाही यावर विश्वासच बसत नाहीए. अश्विनी एकबोटे यांची ही अकाली एक्झिट कलाकारांच्या मनालाही चटका लावून गेली आहे. अश्विनी या एका चांगल्या अभिनेत्रीसोबतच एक व्यक्ति म्हणूनही तितक्याच चांगल्या होत्या. त्यामुळेच त्यांच्यासह विविध मालिकांमध्ये आणि इतर कार्यक्रमामध्ये त्यांच्यातील माणूसपण अनुभवणाऱ्या कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अश्विनी एकबोटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'अश्विनीच्या जाण्याने एक धक्काच बसला आहे', 'त्यांच्या जाण्याने रंगभूमीवर एक प्रकारची खळगीच निर्माण झाली आहे', अशा आशयाचे ट्विट कलाकारांनी केले आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, क्रांती रेडकर, उर्मिला कानेटकर यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन अश्विनी एकबोटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कलाकारांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहतेही सध्या अश्विनी एकबोटे यांना श्रद्धांजली वाहत आहेत.