विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अग्रेसर असलेला मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग महेश एलकुंचवारांचे ‘सोनाटा’ हे नाटक रंगमंचावर आणत आहे. ‘सोनाटा’ या नाटकात मुंबई शहरातील समवयस्क, प्रौढ, अविवाहित, भिन्न भाषक, भिन्न प्रदेशातील, भिन्न वृत्तीच्या पण एकत्र राहणाऱ्या मत्रिणींचे ताणेबाणे आहेत.
‘सोनाटा’ या शीर्षकातही उपरोधिक प्रतीकात्मता आहे. ‘सोनाटा’ हा बिथोविन या पाश्चात्य संगीतकाराने निर्माण केलेला पियानोवरील स्वरांचा सुरेख मेळ आहे. या स्वरमेळात तीन स्वर वेगळे असूनही त्यांच्यात सुमेळ साधला जातो. जो सुमधुर असतो तेवढाच करुण असतो. ‘सोनाटा’ नाटकातील तीन स्त्रियांची जीवनरीत अशी भिन्न प्रकारची आहे आणि तरीही त्या एकत्र येतात तेव्हा एक सुमेळ तयार होतो.. एकूणच नाटक पहाण्यात मजा आहे, कारण राजेंद्र बडे यांचे उत्तम दिग्दर्शन आणि कलाकारांचा नेटका अभिनय. ‘मुंबई विद्यापीठाचे माजी कलाकार विद्यार्थीचे विद्यार्थी कल्याण विभागाबद्दल असलेले ममत्व, त्यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील निवडलेले नाटक व अत्यंत व्यावसायिक पद्धतीने सादर करत असलेल्या संचाबाबत मला आनंद आहे,’ असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख म्हणाले. विद्यापीठ कल्याण विभागचे माजी संचालक डॉ. मृदुल निळे आणि सध्याच्या संचालिका डॉ. मनाली लोंढे यांचा मार्गदर्शनाखाली या नाटकाचा चमू खास निमंत्रितांसाठी २४ नोव्हेंबर रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे नाटकाचा व्यावसायिक प्रयोग करत आहेत.