गेल्या काही वर्षांमध्ये सेल्फी काढण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. म्हणजे ज्यांच्या हातात स्मार्टफोन आहे अशी सर्वच मंडळी एकदा तरी ‘सेल्फी’ काढतातच. विविध ‘अॅप्स’ आणि ‘फिल्टर्स’च्या मदतीने सेल्फीला हटके टच देत काहीजण तर ‘सेल्फी’च्या आहारीच जातात आणि मग ‘सेल्फी’ हे व्यसनच होऊन जातं. बी टाऊनचे कलाकारही सोशल नेटवर्किंग साइट्सवर त्यांचे अनेक ‘सेल्फी’ पोस्ट करत असतात. यात मराठी कलाकार तरी कसे मागे राहतील. कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपल्या मित्रमंडळींसोबत अनेकजण सेल्फी काढताना दिसतच.

याच सेल्फीच्या मोहात पडली ती म्हणजे मराठीतली गुणी अभिनेत्री मुक्ता बर्वे. तिचा हा सेल्फी होताही तेवढाच खास. हे आम्ही नाही तर खुद्द मुक्ताच सांगते. तिच्यासाठी हा सर्वोत्तम सेल्फी असल्याचे तिने म्हटले आहे. इन्स्टाग्रामवर तिने हा तिचा फोटो शेअर केला आहे. तसेच तिने बॉलिवूडच्या किंग खानचे आभारही मानले आहेत.

काही दिवसांपूर्वीच फॅशन डिझायनर विक्रम फडणीस याच्या ‘हृदयांतर’ या मराठी सिनेमाचा मुहूर्त पार पडला. या सिनेमाचा मुहूर्त अभिनेता शाहरुख खानच्या हस्ते करण्यात आला होता. ‘हृदयांतर’ या विक्रम फडणीसच्या पहिल्याच मराठी सिनेमात अभिनेता सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

एका दाम्पत्याची त्यांच्या वैवाहिक जीवनातली वादळांशी असलेली झुंज दाखवणारा हा सिनेमा असणार आहे. त्यामुळे या सिनेमाच्या मुहूर्तावेळी मुक्ताने किंग खानसोबत हा सेल्फी काढण्याची संधी सोडली नसल्याचे दिसत आहे. पण जर बॉलिवूडचा किंग तुमच्या सिनेमाचा मुहूर्त करणार असेल तर त्याच्यासोबत एखादा सेल्फी तर झालाच पाहिजे ना..

मुक्ताने यापूर्वी मराठी सिनेसृष्टीत अनेक नावाजलेल्या सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये काम केले आहे. आपल्या समृद्ध अभिनयाने तिने रसिकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे. डबलसीट, मुंबई- पुणे- मुंबई, गणवेश, वायझेड असे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.