पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा दरम्यान ओम पुरी यांचा विषय निघताच ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना गहिवरुन आले. या महोत्सवाच्या निमित्ताने नसिरुद्दीन शाह यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी शाह यांनी दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या अनेक आठवणी आणि किस्से सांगितले.

ओम पुरींना एकदा एका  व्यक्तीने हिणवले होते. तुझा चेहरा चेहरा सिनेमॅटिक नाही असे त्याने म्हटले होते. मुळात हे विधानच हास्यास्पद आहे. त्यांचा चेहरा एखाद्या लॅंडस्केप सारखा होता. अशी भावना शाह यांनी व्यक्त केली.

नसिरुद्दीन शाह यांची मुलाखत अनिल झणकर यांनी घेतली. या मुलाखती दरम्यान नसिरुद्दीन शाह यांनी ओम पुरींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले.  आपल्या जिवलग मित्राच्या आठवणी सांगताना नसिरुद्दीन शाह हे भावूक झाले होते. ‘ओम बरोबरचे नाते अतिशय खोलवर रुजलेले होते. तो कायम अभिनय करताना स्वतः मध्ये गुंग असायचा. डोळयांनी आणि आवाजाने तो भूमिका अभिव्यक्त करायचा,’ असे ते म्हणाले.

ओम पुरींनी आपल्या कारकीर्दीमध्ये विविध अंगी भूमिका साकारल्या. त्यामध्ये पकिस्तानी राष्ट्राध्यक्ष ते सर्व सामान्य आदिवासी व्यक्तीपर्यंत कोणतीही भूमिका करताना त्यांच्यामध्ये जो बदल व्हायचा तो आश्चर्यकारक होता. तेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे. तसेच, ओम पुरी हे जगातील खरोखरच सर्वश्रेष्ठ अभिनेते होते असे शाह यांनी म्हटले.  कष्ट करण्याची तयारी आणि हाती घेतलेले काम तडीस नेण्याची त्यांची वृत्ती शिकण्यासारखी आहे, असे शाह यांनी यावेळी म्हटले.

नसिरुद्दीन शाह यांनी ओम पुरी सोबत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.