बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याच्या गाड्यांच्या ताफ्यात अजून एका नवीन गाडीची भर पडली आहे. ‘निसान टेरेनो एसयूव्ही’ या गाडीचा दिमाखात त्याच्या गॅरेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. निसान कंपनीचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनल्यानंतर निसानने ही गाडी जॉनला भेट म्हणून दिली. निसान गाडीच्या आधीही जॉनकडे अनेक गाड्या आणि बाइक्स आहेत. जॉनला आधीपासूनच गाड्यांचे वेड आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, बाइक्सबरोबरच त्याला रेट्रो बाइक्सही खूप आवडतात. त्याच्या गाड्यांच्या ताफ्यांमध्ये क्रुझर बाइक कमी असल्या तरी त्याला क्रुझर बाइक्सही फार आवडतात.
जॉनकडे सध्या कावासाकी ‘झेडझेड१४०० (झेडएक्स-१४),’ ‘यामाहा वीमॅक्स १७००’, ‘डुकाटी डियावेल’, ‘यामाहा एफझेड-१६०’, ‘लॅम्बोर्गिनी गैलायार्डो’, ‘मारुती जिप्सी’, ‘ऑडी क्यू७’ यांच्याव्यतिरिक्त अजून दोन गाड्याही येणार आहेत. ज्यात ‘निसान पेट्रोल’ आणि ‘२०१७ निसान सीटीआर’ यांचा समावेश आहे. जॉनने यापैकी एक गाडी तर खरेदी केली आहे. तर दुसरी गाडी नोव्हेंबरपर्यंत येणार आहे. जॉनचं गाड्यांचं असणारे कलेक्शन बघून त्याला वेग किती आवडत असेल याचा अंदाज तर येतोच. त्याने हे ही सांगितले की ३०० किमी प्रती तास एवढ्या वेगाने त्याने गाडी आणि बाइक चालवली आहे. त्याच्या ‘धूम’ आणि ‘ढिशूम’ मध्येही त्याचे गाडी प्रेम सगळ्यांना दिसून आले आहे. जॉनलाही अॅक्शन सिनेमे करायला जास्त मजा येते असं त्याने मान्य केले आहे.
बॉलिवूड आणि गाड्या यांचे संबंधही तसे जुनेच. कारण बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्दर्शक, अभिनेते, गायक आणि निर्माते आहेत ज्यांचे गाड्यांवर जॉन एवढेच प्रेम आहे. गायक मोहम्मद रफी यांनी भारताला पहिल्यांदी ‘होंडा अॅकॉर्ड’ आणि ‘ऑडी’ची ओळख करुन दिलेली. याशिवाय रफी यांना ‘प्रिमिअर पद्मिनी’ ही गाडीही फार आवडायची.