प्रेयसी हेजल कीच हिला वेस्टर्न युनियनच्या कार्यालयात अपमानास्पद वागणूक दिल्याने क्रिकेटपटू युवराज सिंग याने संताप व्यक्त केला आहे. वेस्टर्न युनियनच्या जयपूर य़ेथील शाखेत एका कर्मचाऱ्याकडून वंशभेदी वागणूक मिळाल्याचा आरोप हेजल किच हिने केला होता. तुमचे नाव हिंदूंसारखे वाटत नाही, असे सांगत या कर्मचाऱ्याने हेझलला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर हेजलने ट्विटरच्या माध्यमातून याबद्दलचा संताप व्यक्त केला. वेस्टर्न युनियनच्या कार्यालयात पियुष मिश्रा या व्यक्तीने मला वंशभेदी वागणूक दिली. माझे नाव हिंदूंसारखे वाटत नाही, म्हणून त्याने पैसे द्यायला नकार दिला, असे हेझलने ट्विटमध्ये म्हटले आहे. हेझलच्या या ट्विटवर युवराज सिंगने संताप व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली. वेस्टर्न युनियनच्या कार्यालयात घडलेला हा प्रकार धक्कादायक आहे. अशाप्रकारचा वंशभेद खपवून घेता येणार नाही. वेस्टर्न युनियनकडून संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी आशा युवराजने ट्विटमध्ये व्यक्त केली.
युवराज आणि हेजल यांचा २०१५मध्ये साखरपुडा झाला होता. मात्र, अजूनही या दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. इंडोनेशियात बाली येथे बुधवारी दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला. गेली अनेक दिवस माध्यमांमधून दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होत होती. हरभजन सिंगच्या लग्नात युवी व हेजल एकत्र आल्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचवल्या होत्या.