वाढदिवसानिमित्त अरुण दाते यांचा चाहत्यांना सल्ला

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचा ८२ वा वाढदिवस बुधवारी त्यांच्या निवासस्थानी साधेपणाने साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने घरी शुभेच्छा देण्यासाठी आलेली मोजकी मित्रमंडळी, पारिचित, नातेवाईक आणि स्वत: अरुण दाते यांच्यात गप्पांची अनौपचारिक मैफल रंगली.. जगण्यावर शतदा प्रेम करण्याचा प्रेमळ सल्ला यावेळी दाते यांनी चाहत्यांना दिला.

गायक मंदार आपटे हे दाते यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते. शुभेच्छा दिल्यानंतर आपटे यांनी दाते यांचे ‘येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील’ हे गाणे म्हटले तर स्वत: दाते यांनी ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे गाणे गाऊन सगळ्यांना पुन्हा एकदा स्मरणरंजनात नेले.. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर, गायक मिलिंद इंगळे, अभिनेते व कवी किशोर कदम तथा सौमित्र, दिवंगत मंगेश पाडगावकर यांचे चिरंजीव अजित पाडगावकर तसेच ज्येष्ठ चित्रपट कथा-पटकथा व संवाद लेखक आणि दाते यांचे इंदूरपासूनचे बालपणाचे मित्र सलीम खान यांनी दूरध्वनी करून अरुण दाते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अभिष्टचिंतन केले.

गायक ही अरुण दाते यांची ओळख असली तरी ते ‘टेक्स्टाईल इंजिनिअर’ आहेत. त्यांनी काही काळ नोकरीही केली होती. ‘बिर्ला टेक्स्टाईल डिव्हिजन’ येथे उपाध्यक्ष म्हणून नोकरी करत असताना त्यांच्या कार्यालयात गायकवाड हे शिपाई म्हणून कामाला होते. दाते यांना शुभेच्छा देण्यासाठी गायकवाड यांनी सासवड येथून दूरध्वनी केला होता.