‘सावरिया’ रणबीर त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अभिनेत्री दीपिका पदुकोणपासून ते अगदी कतरिना कैफपर्यंत रणबीरच्या प्रत्येक प्रेमप्रकरणाला माध्यमांनी बरीच हवा दिली. मुख्य म्हणजे या अभिनेत्रींसोबतच त्याचं नाव इतरही काही मॉडेल्स आणि इंडस्ट्री बाहेरील ‘मिस्ट्री गर्ल्स’शी जोडलं गेलं होतं. काही दिवसांपासून तर तो चक्क एका पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करत असल्याचंही म्हटलं जात होतं. रणबीर आणि पाकिस्तानी अभिनेत्री… हे ऐकून अनेकांनाच धक्का बसला. किंग खानच्या ‘रईस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या माहिरा खानला ‘चॉकलेट बॉय’ रणबीर डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा होत्या.

रणबीर आणि माहिराच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आल्याचं लक्षात येताच या अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या संपूर्ण विषयावर स्पष्टीकरण देत एक पोस्ट केली. या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. तिने पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये या सर्व अफवांना अनुसरुन पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोमध्ये ‘फर्स्ट ऑफ ऑल नो… सेकंड ऑफ ऑल नो’ असं लिहिण्यात आलंय. ही पोस्ट पाहता तिने कमी शब्दांतच सर्व अफवांना पूर्णविराम दिल्याचं लक्षात येतंय.

रणबीर कपूरसोबत आपलं नाव उगाचच जोडलं जात असल्याचं पाहून माहिराने याविषयी तिचं मत मांडलं. सूत्रांनी दिलेल्या माहतीनुसार ‘माहिराने या अफवांवर निराशा व्यक्त केली आहे. रणबीरला एक- दोनदा भेटल्यामुळे आणि त्यानंतरही त्याच्या संपर्कात असल्याचा अर्थ असा होत नाही की ते दोघं डेट करत आहेत.’ माहिरा विवाहित असून, तीन वर्षांच्या मुलाची आई आहे.

दरम्यान, शाहरुखच्या ‘रईस’ या चित्रपटातून माहिराचा चेहरा सर्वांसमोर पोहोचला आहे असं नाही. याआधी ती ‘हमसफर’ या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. काही महिन्यांपूर्वीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तिची आणि रणबीरची भेट झाली होती. तेव्हा त्यांचा एक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये माहिरा रणबीरकडे विनवणी करताना दिसत होती. त्यांचा हा व्हिडिओ बराच चर्चेत आला होता. पण, त्यांतर मात्र तिचं नाव दूरदूरपर्यंत कुठेच नव्हतं आणि अचानक गेल्या काही दिवसांपासून माहिरा चर्चेत आली ती म्हणजे रणबीरला डेट असल्याच्या अफवामुळे. या सर्व अफवांना तिने दिलेलं हे उत्तर पाहता आता तरी वायफळ चर्चा थांबणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

वाचा : ‘लगान’मधील ‘ती’ सध्या काय करते?