रजनीकांत यांच्या चित्रपटासाठी चाहत्यांची जय्यत तयारी; अवघी मुंबई ‘कबाली’मय

सलमान म्हणतो माझा चित्रपट ईदला, शाहरूख म्हणतो माझा चित्रपट दिवाळीला, आमिरचा चित्रपट नाताळला असे सुट्टीचे वार बॉलीवुडच्या कलाकारांनी वाटून घेतले आहेत. पण स्टारडमच्या बाबतीत या सगळ्यांना वयाच्या सहासष्टाव्या वर्षीही मागे टाकणाऱ्या रजनीकांत यांचा चित्रपट ज्या दिवशी प्रदर्शित होतो तो सुट्टीचा वार ठरतो, हा विनोद सध्या फेसबुकपासून ट्विटपर्यंत वेगाने पसरतोय. तब्बल दोन वर्षांनंतर प्रदर्शित होणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कबाली’ने सध्या सर्वसामान्यांना वेड लावले आहे. शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी रजनीकांत यांच्या चाहत्यांनी अवघी मुंबई ‘कबाली’मय करून सोडली आहे.

२०१४ मध्ये आलेल्या ‘लिंगा’नंतर रजनीकांत यांचा ‘कबाली’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.

या चित्रपटात रजनीकांत पुन्हा एकदा त्यांच्या स्टाईलबाज भूमिकेत दिसणार आहेत. मलेशियातील तमिळ लोकोंना समान वेतन मिळावे यासाठी झगडणाऱ्या गँगस्टर कबालीश्वरची भूमिका रजनीकांत यांनी केली आहे. रजनीकांत यांचा चित्रपट म्हणजे माटुंग्यातील अरोरा चित्रपटगृहात दसरा-दिवाळीसारखे उत्सवी वातावरण असते. याहीवेळी चित्रपटगृहाबाहेर रजनीकांत यांचे मोठे कटआऊट् लावण्यात आले आहे. या चित्रपटगृहात ‘कबाली’चे दररोज पाच खेळ दाखवण्यात येणार आहेत. शिवाय, पहाटे ३ वाजताही रजनीच्या चाहत्यांना हा चित्रपट पाहता यावा यासाठी विशेष खेळ लावण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी या चित्रपटगृहाचे मालक नम्बी राजन यांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘कबाली’च्या जाहिरातीही वेगळ्या पध्दतीने करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेमध्ये ‘कबाली’ची जाहिरात खुद्द रजनीकांत यांच्या आवाजात ऐकायला मिळते. ‘यात्रीगण कृपया ध्यान दे..’ अशा शब्दांत प्रवाशांना आवाहन करत रजनीकांत यांनी ‘कबाली’ पाहण्याचे आवाहन केले आहे.

पायरसीमुळे ‘कबाली’वर परिणाम होणार नाही..

‘उडता पंजाब’, ‘सुलतान’ आणि ‘ग्रेट ग्रँड मस्ती’नंतर रजनीकांत यांचा ‘कबाली’ही ऑनलाईन लीक झाला. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी तसे काहीही झाले नसल्याची भूमिका घेतली. एवढेच नाही तर ऑनलाईन लीक झाल्याची बातमी वेगाने पसरताच ‘कबाली’च्या प्रसिध्दीवर आणखी जोर देण्यात आला. मंगळवारपासून मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी ‘कबाली बस’ फिरते आहे. रजनीकांत यांचे ‘कबाली’ चित्रपटातील छायाचित्र रंगवण्यात आलेली डबलडेकर बस, रजनीकांत यांच्या चेहऱ्याचे मुखवटे घातलेल्या त्यांच्या चाहत्यांनी सगळीकडे फिरून ‘रजनी’रंग पसरवले. शहरातील भिंतीही सध्या रजनी यांच्या चित्रांनी रंगलेल्या आहेत. त्यांच्या चाहत्यांच्या ‘रजनी’ भक्तीवर निर्मात्यांचा एवढा विश्वास आहे की ‘कबाली’ पायरेटेड झाला तरीही त्याचा चित्रपटाच्या व्यवसायावर काहीही परिणाम होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. अरोरा चित्रपटगृहात शुक्रवारच्या फर्स्ट डे फर्स्ट शोपासून रविवापर्यंत शोजचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग पूर्ण होत आले असल्याने पहिल्या तीन दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करेल, असा ट्रेड विश्लेषकांनीही अंदाज वर्तवला आहे.