सध्या यशाच्या शिखरावर असलेली अभिनेत्री राधिका आपटे ही ‘कबाली’च्या प्रमोशनवेळी उपस्थित न राहिल्याने त्याचे तिला वाईट वाटत आहे. चित्रपटात रजनीकांत यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी राधिका ही दुस-या चित्रपटाच्या कामात सध्या व्यस्त आहे. यामुळेच ती ‘कबाली’च्या प्रमोशनला उपस्थित राहू शकली नाही, असे राधिकाचे म्हणणे आहे. यास तिने तिचे दुर्भाग्य असल्याचे म्हटलेय.
वोग ब्युटी अवॉर्डसला राधिकाने उपस्थिती लावली होती. त्यावेळी तिला तू ‘कबाली’च्या प्रमोशनपासून का दूर राहिलीस असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली की, मला माहित आहे आणि मला याच वाईटही वाटत आहे. मी सध्या ‘घौल’ चित्रपटाचे शूटींग करत आहे. त्याच्यामुळेच माझं शेड्यूल व्यस्त असून माझ्याकडे प्रमोशनसाठी वेळच नव्हता. सुप्रसिद्ध स्टार रजनीकांत यांच्या ‘कबाली’ चित्रपटाने सहा दिवसांत ३०० कोटींचा गल्ला जमविला आहे. चित्रपटाच्या यशाविषयी बोलताना राधिका म्हणाली की, मला वाटतं की हा चित्रपट सर्व रेकॉर्ड तोडत आहे. ही खूप चांगली बाब आहे. रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपचं छान होता. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या अनुभवांपैकी हा एक होता.
‘कबाली’ने आतापर्यंत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. रजनीकांत यांचा मोठा चाहतावर्ग असल्याने या चित्रपटाविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये खूपचं उत्सुकता होती. या चित्रपटाच्या पहिल्या तीन दिवसांच्या शोच्या सर्व तिकीटांची विक्री प्रदर्शनापूर्वीच झाली होती.