बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आगामी ‘बार बार देखो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नित्या मेहरा दिग्दर्शित या चित्रपटात कतरिना नव्या लूकमध्ये दिसेल.
आपल्या लूकसोबत नवेनवे प्रयोग करणा-या कतरिनाने तिच्या नव्या लूकसाठी केस कापले आहेत. चित्रपटातील लूक अधिक खुलून यावा याकरिता तिने मानेपर्यंत केस कापले आहेत. योग्य ती केशरचना मिळवण्यासाठी कतरिनाने तिच्या केसांवर काही प्रक्रिया करून घेतल्याचेही कळते. एखाद्या भूमिकेसाठी कतरिनाने तिची हेअरस्टाईल बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ‘फितूर’ चित्रपटातील तिच्या लाल रंगाच्या केशरचनेने अनेकांचे लक्ष वेधले होते. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात कतरिना पहिल्यांदाच आदित्य रॉय कपूरसह रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
‘बार बार देखो’ या चित्रपटाने नित्या मेहरा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि तब्बू यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रितेश सिधवानी, करण जोहर आणि फरहान अख्तरची निर्मिती असलेला हा चित्रपट २०१६मध्ये प्रदर्शित होईल.