‘सैराट’ सिनेमाने लोकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवले होते. आजही परश्या आणि आर्चीची क्रेझ लोकांमध्ये कमी झालेली नाही. झिंगाट, सैराट ही गाणी ऐकू आली की आपसूक प्रत्येकाचे पाय थिरकल्याशिवाय राहत नाहीत. पण हा सिनेमा कितीही हिट झाला असला तरी हा सिनेमा लोकांचे प्रबोधन करु शकला नाही, असे मत सिनेमाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने याने व्यक्त केले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत नागराज मुंजळे बोलत होता. सिनेमाच्या माध्यमातून जी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला ते सोडून लोकांना सगळं कळलं. लोकांना झिंगाट कळले, सैराट कळले, आर्ची, परशा एवढेच काय तर १०० कोटीही कळले, मात्र प्रबोधन झालेच नाही, अशा शब्दात नागराज मंजुळे याने आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात सिनेमातून समाज प्रबोधन करणे हे एक आव्हान असल्याचे नागराज म्हणाला.

नागराज म्हणाला की, “कुणी कोणाला मारु नये, हिंसा करु नये, किमान एवढं तरी ज्ञान या सिनेमातून घ्यायला हवं होतं असं मला वाटतं. पण सिनेमातून हा मेसेज घ्यायचा सोडून लोकांना झिंगाट कळलं, सैराट कळलं, आर्ची कळली, परशा कळला, १०० कोटी कळले, सगळं जग कळतं. पण प्रबोधनाची कधी कधी मला खूप गंमत वाटते, प्रबोधन खरंच होऊ शकतं का? एवढा सिनेमा करायचा आणि परत कार्यक्रमांमध्ये येऊन सांगावं लागणं याचं मला हसू येतं. मग जर कार्यक्रमांत येऊनच हे सगळं सांगावं लागणार असेल तर सिनेमा का करायचा हा प्रश्न मला पडतो. म्हणूनच प्रबोधन खूप वेगळं आहे आणि पिक्चर वेगळा आहे असं मला वाटतं.”