बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान बऱ्याचदा यश राज फिल्मस आणि धर्मा प्रोडक्शन यांच्यासोबत काम करताना दिसला आहे. चित्रपटसृष्टीतील आपल्या कामाचा अंदाज शाहरुखने एका मुलाखतीवेळी सांगितला. माझ्यावर जे प्रेम करत नाहीत त्यांच्यासोबत मी काम करण्याचा विचार करत नाही, असे शाहरुखने म्हटले आहे. सीएनएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुखने आगामी ‘ट्युबलाइट’ चित्रपटातील भूमिकेविषयीही व्यक्त झाला. कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाइट’ या चित्रपटातून शाहरुख-सलमान ही जोडी बऱ्याच दिवसांनी एकत्र येणार आहे. सलमानची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटात शाहरुख एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

सलमान सोबत बऱ्याच दिवसांनी काम करण्याचा आनंद व्यक्त करताना शाहरुख म्हणाला की, सलमानसोबत चित्रीकरण करताना धमाल आली. मी सलमान खानच्या या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका करत आहे, असेही त्याने स्पष्ट केले. यापूर्वी ‘करण अर्जुन’ या चित्रपटामध्ये सलमान- शाहरुख ही जोडी एकत्र दिसली होती. तसेच ‘कुछ कुछ होता है’ या शाहरुख खानची मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटामध्ये सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. दरम्यान, अभिनयासाठीचा उत्साह २५ वर्षापासून आजपर्यंत कायम असल्याचे देखील शाहरुखने सांगितले.

आगामी ‘रईस’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झालेल्या शाहरुखच्या आत्मचरित्राची देखील चांगलीच उत्सुकता आहे. शाहरुख आपला जीवनप्रवास पुस्तकाच्या माध्यमातून मांडणार आहे. दिल्लीच्या सामान्य मुलाचा प्रवास जाणून घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांमध्येही नक्कीच उत्सुकता असेल. शाहरुखने आत्मचरित्राविषयी निर्माण होणाऱ्या अडचणीविषयी मत व्यक्त केले. आत्मचरित्रातील पाच प्रकरणे पूर्ण केली असून आत्मचरित्र पूर्ण करण्यामध्ये व्यग्र कामातून संघर्ष करावा लागत असल्याचे तो म्हणाला. भविष्यातील नियोजनाबद्दल शाहरुखने हटके उत्तर दिले. मी केलेले कोणतेही नियोजन सफल झालेले नाही. त्यामुळे आयुष्यातील कोणत्याही गोष्टीविषयी नियोजन करणेच मी बंद केल्याचे शाहरुखने म्हटले.

शाहरुख खानचा आगामी ‘रईस’ चित्रपट अनेक कारणांनी चर्चेत आला आहे. या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘रईस’ हा चित्रपट गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती चित्रपटाचे कथानक फिरताना दिसणार आहे. २५ जानेवारीला ‘रईस’ आणि ‘काबिल’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.