ये ढाई किलो का हात जिसपर पडता है वो उठता नही उठ जाता है…. अभिनेता सनी देओलच्या या एका डायलॉगवर त्यावेळी अनेक तरुणी घायाळ झाल्या होत्या. सनीच्या याच घायाळ करणाऱ्या अदांची झलक त्याचा मुलगा करण देओलमध्ये पाहावयास मिळणार आहे. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून सनी त्याच्या मुलाला बॉलिवूडमध्ये आणत आहे. आपल्या लाडक्या लेकासाठी तो या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील करणार आहे.

सनी गेल्या काही दिवसांपासून मनाली येथे चित्रीकरणाचे काम करत असून, आता करणनेही त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. करणने पहिल्यांदाच सेटवर हजेरी लावल्यानंतर भावूक झालेल्या सनीने मुलासोबतचा फोटो ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने लिहिलंय की, ‘पल पल दिल के पासच्या चित्रीकरणाला सुरुवात झालीये. करणचा आज सेटवर पहिलाच दिवस आहे. माझा मुलगा आता इतका मोठा झाला आहे हे खरं वाटत नाहीये.’ यास त्याने #love #actor #life (अभिनेत्याचे आयुष्य आवडते) असे हॅशटॅगही दिले आहेत. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान यानेदेखील या पिता-पुत्राला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ऑल द बेस्ट पापा. हा तुझ्यासारखाच राकट दिसतोय. तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू दे,’ असे त्याने ट्विट केलेय. शाहरुख आणि सनीने यश चोप्रा यांच्या ‘डर’ चित्रपटात एकत्र काम केले होते.

सनीने काही महिन्यांपूर्वीच ट्विटर अकाउंट सुरु केले. तेव्हापासून तो आपल्या आगामी चित्रपटांबद्दल वरचेवर माहिती देत असतो. त्याचसोबत तो सेटवरील फोटोही ट्विट करतो. या चित्रपटात सनीचा लहान भाऊ आणि अभिनेता बॉबी देओलही काम करतोय. सध्या सनी ‘भैय्याजी सुपरहिट’ आणि ‘पोस्टर बॉइज’ या दोन चित्रपटांची तयारी करतोय. गेल्यावर्षी त्याने दिग्दर्शित केलेला ‘घायल वन्स अगेन’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर याची फारशी कमाल पाहावयास मिळाली नाही. तरीही भविष्यात ‘घायल ३’ची निर्मिती करण्याचा विचार असल्याचे सनीने एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते.