स्टार प्लस वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मालिकेतील कलाकार रोहन मेहरा आणि कांची सिंग हे ख-या आयुष्यात एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे हे दोन्ही कलाकार त्यांच्या कार्यक्रमाच्या कामात पुरेसं लक्ष देत नसल्याची चर्चा आहे. मालिकेत रोहन हा नक्षची तर कांची ही गायत्रीची भूमिका साकारत आहेत. छोट्या पडद्यावर बहिण-भावाची भूमिका साकारत असलेल्या या कलाकारांना स्टार प्लसकडून अनेकदा तंबी देण्यात आली.  पडद्यावर भाऊ-बहिणीच्या जोडीला प्रेक्षक अशा रुपात स्वीकारणार नाहीत, म्हणून या कलाकारांनी आपले पडद्यामागील प्रेम थांबवावे असे स्टार प्लसचे म्हणणे आहे. याविषयीचे वृत्त स्पॉटबॉय डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन आणि कांचीने त्यांच्या प्रेमसंबंधांबाबत थोडी गुप्तता बाळगायला हवी असे वाहिनीमार्फत त्यांना सतत सांगितले जात आहे. सर्वसामान्य प्रेक्षक संवेदनशील असल्याने टेलिव्हिजनवर भावंडांची भूमिका साकारणा-या कलाकारांना अशाप्रकारे ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे रोहन आणि कांची त्यांच्या नात्याबाबत जितकं जास्त बोलतील तितका जास्त परिणाम त्यांच्या मालिकेतील भूमिकेवर होईल. हे स्टार प्लसला अजिबात मान्य नाही. हे दोघेही कलाकार एकत्र मुलाखत देत असताना त्यांना प्रत्येकवेळी वाहिनीकडून विशेष ताकीद दिली गेली. पण, या दोघांनाही त्यास गांभीर्याने न घेतल्याने शेवटी मालिकेत बदल करण्याचे स्टार प्लस वाहिनीने ठरवलेय.