बी-टाऊनमध्ये कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्यात काहीना काही नाते असतेच. त्यामुळेच बॉलिवूड हे एक मोठे कुटुंबच आहे असं म्हणायला हरकत नाही. या कुटुंबातलं एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे विद्या बालन. विद्याचे चित्रपट आणि तिने आजवर साकारलेल्या भूमिकांमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

विद्या बालनचा पती सिद्धार्थ रॉय कपूर हासुद्धा याच कुटुंबाचा एक भाग आहे. बी- टाऊनच्या काही आघाडीच्या निर्मात्यांपैकी एक म्हणजे सिद्धार्थ रॉय कपूर. सिद्धार्थ आणि विद्याचे नाते पाहता येत्या काळात हे दोघंही उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करतील अशी आशा प्रेक्षकांना होती. पण, तसं काहीच झालं नाही. ‘नो वन किल्ड जेसिका’ हा चित्रपट वगळता विद्याने सिद्धार्थच्या निर्मिती संस्थेअंतर्गत पुन्हा कधीही काम केलं नाही.

विद्या-सिद्धार्थचे भावी आयुष्यातील काही प्लॅन्स पाहता त्या दोघांनीही एकमेकांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जातंय. याविषयी सांगताना ‘फिल्मफेअर’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत विद्याने सिद्धार्थसोबत काम न करण्याचं कारण स्पष्ट केलं. ‘आम्हा दोघांनीही एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला हे एका अर्थी चांगलंच झालं. कारण, कामाच्या गोष्टी घरात आणून आम्हाला घराचं रुपांतर चित्रपटाच्या सेटमध्ये करायचं नव्हतं. तसंही, इंडस्ट्रीत इतरही निर्माते आहेतच ज्यांच्यासोबत मी काम करु शकते. त्यामुळे हाच योग्य निर्णय आहे. त्यामुळे एका अर्थी आम्ही स्वार्थीच आहोत… (मिश्किलपणे हसून)’, असं विद्या म्हणाली.

सिद्धार्थसोबत काम न करण्याविषयी विद्याला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये विचारण्यात येतं. अशाच एका मुलाखतीत विद्या म्हणाली होती, ‘‘मी आणि माझ्या पतीने आधीच ठरवले होते की, आम्ही एकमेकांसोबत काम करणार नाही. कारण, पती-पत्नीच्या नात्यामध्ये आम्ही कामाचे वातावरण बनवू इच्छित नव्हतो.’ नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव येऊ नये यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फायदाच झाल्याचे विद्या नेहमी सांगते. त्यामुळे बॉलिवूडच्या या आघाडीच्या अभिनेत्रीला करिअर आणि संसार यांचा सुवर्णमध्य साधायला चांगलच जमलं आहे असंच म्हणावं लागेल.