उस्ताद अमजद अली खाँ यांचा सवाल

अभिजात शास्त्रीय संगीत हीच माझी संपत्ती आणि स्वर हेच माझे परमेश्वर आहेत. गुरुप्रती श्रद्धा ठेवून रियाझ आणि साधना यातून कलाकार घडत असतो. त्यामुळे संगीताचा प्रचार हा शब्दप्रयोगच मुळी चुकीचा आहे, असे मत ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी शुक्रवारी व्यक्त केले. संगीत हे काही कोकाकोला किंवा टूथपेस्टसारखे उत्पादन नाही. त्यामुळे ‘प्रमोशन’ करायला संगीत म्हणजे ‘प्रॉडक्ट’ आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरोद म्हणजे ‘बेपडदा साज’ आहे. नखांचा योग्य वापर, एकाग्रता, साधना, गुरूंचे आशीर्वाद नसेल तर कलाकार ‘बेपडदा’ होतो, अशी टिप्पणी त्यांनी केली.

‘मास्टर ऑन मास्टर्स’ पुस्तकाचे लेखक या नात्याने उस्ताद अमजद अली खाँ यांच्या हस्ते पाचव्या ‘पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल’चे उद्घाटन झाले. एमआयटीचे विश्वनाथ कराड, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे भरत अगरवाल, लेखक-माहितीपट निर्माते नील हॉलंडेर, फेस्टिव्हलच्या संयोजक मंजिरी प्रभू, सल्लागार समिती सदस्य अशोक चोप्रा या वेळी उपस्थित होते.

कलाकाराला लोकप्रियता प्राप्त होते तेव्हा तो केवळ स्वत:विषयीच बोलतो आणि गुरूचा नामोल्लेख टाळतो. गुरूवर श्रद्धा नसलेला शिष्य आपले लक्ष्य साध्य करू शकत नाही, असे सांगून अमजद अली म्हणाले, यशाला कोणताही ‘शॉर्ट कट’ नसतो. मेहनत, तहजीब आणि तमीज हे गुण शिष्याला कलाकारापर्यंत घेऊन जातात. कलाकारांनी लोकसंगीत ऐकले पाहिजे. आपल्याकडे प्रत्येक प्रांतामध्ये विविध सुगंध असलेले समृद्ध संगीत आहे. लहानपणापासून संगीताच्या वातावरणातच मी वाढलो. संगीत हाच आपला देव आहे ही शिकवण वडिलांनी दिली. हवा, पाणी, रंग, गंध याप्रमाणे संगीत हे देखील मुक्त आहे. त्यामुळे सप्तसूर हाच संगीताचा धर्म आहे. भाषा वाचावी आणि समजून घ्यावी लागते. तर, संगीत अनुभवायचे असते. संगीताच्या जगात राहतो हे माझे भाग्यच आहे. संगीताच्या सात स्वरांनी जगाला एकत्र जोडले आहे. मी भाषेचा आदर करतो. परंतु, काही वेळा भाषेमुळे भिंती निर्माण होतात.

कलाकारांना अनेकदा उशिरा पुरस्कार मिळतात. वृद्धापकाळी मिळालेल्या पुरस्काराचा काय उपयोग? त्या ऐवजी योग्य वयात कलाकारांचा गौरव झाला, तर पुढील वाटचालीसाठी त्यांची उमेद वाढेल, असे अमजद अली यांनी सांगितले. पाश्चात्त्य संगीताला नावं ठेवणं सोपं आहे. त्या संगीताला असलेल्या परंपरेचा अभ्यास केला जात नाही. त्या संगीतामध्ये संयोजकाला महत्त्व आहे. दीडशे कलाकार एकत्र येऊन उत्तम ऑक्रेस्ट्रा निर्मिती करतात. आपल्याकडे दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्याची मानसिकता नसल्याने असे संगीत निर्माण होत नाही, याकडेही अमजद अली यांनी लक्ष वेधले.