क्रिकेटपटू आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री यांच्यातील प्रेमसंबंधांबाबत कायमच चर्चा रंगताना दिसतात. भारतीय संघाचा कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यातील नात्याबाबतही मागील काही दिवसांपासून चर्चा चालू आहे. भारतीय संघातील माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या नुकत्याच झालेल्या साखरपुड्यालाही विराट आणि अनुष्का एकत्र दिसले. त्यामुळे त्यांच्यात नक्कीच ‘काहीतरी’ असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

विराट आणि अनुष्का यांचे प्रेमप्रकरण जगजाहीर असताना या दोघांनी मात्र अद्याप ते मान्य केलेले नाही. मात्र अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी एकत्रितपणे उपस्थित राहिल्याने त्यांनी आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरदरम्यान विराट आणि अनुष्काही साखरपुडा करणार असल्याचा विषय मध्यंतरी चर्चेत होता.

झहीर खान आणि सागरिका घाटगे या जोडीबाबतही मागील काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. नुकत्याच झालेल्या इंडियन प्रिमियर लिगच्या दहाव्या सिझनदरम्यान सागरिकाने आपल्या या नात्याबाबतचे गुपित सर्वांसमोर उघड केले होते. मंगळवारी या दोघांचा साखरपुडा झाला असून त्यांनी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

बॉलिवूडमधील अनेक प्रथितयश कलाकारांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यामध्ये रवीना टंडन व तिचा पती अनिल थडानी, मंदिरा बेदी, बॉबी देओल, अर्शद वारसी आणि त्याची पत्नी मारीया गोरेट्टी उपस्थित होते. याशिवाय रोहित शर्मा, युवराज सिंग, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली, गौरव कपूर हेही उपस्थित होते.

पोपटी रंगाचा वनपीस परिधान केलेली सागरिका आणि ग्रे रंगाचा ब्लेझर घातलेला झहीर यांची जोडी एकमेकांना साजेशी दिसत होती. लवकरच आपण लग्नाची तारीखही जाहीर करु, असे सागरिकाने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.

 

zaheer-sagarika