दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या आठवड्यात दोन मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एकीकडे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘सिक्रेट सुपरस्टार’ तर दुसरीकडे दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये स्पर्धा होणं साहजिक आहे आणि याचीच चिंता रोहित शेट्टीला सतावत आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये अजयसोबतच परिणीती चोप्रा, अर्षद वारसी, तुषार कपूर, तब्बू, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे यांच्याही भूमिका आहेत. तर आमिरचा ‘सिक्रेट सुपरस्टार’ १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये ‘दंगल गर्ल’ झायरा वसीम मुख्य भूमिकेत झळकणार आहे. एका मुलाखतीत रोहितने त्याची चिंता व्यक्त केली. ‘हा माझा आतापर्यंतचा सर्वांत महागडा चित्रपट आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’पेक्षाही जास्त खर्च मी या चित्रपटासाठी केला आहे. ‘गोलमाल ३’ चे जेवढे बजेट होते त्याच्या दुप्पट खर्च झाला आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल की नाही माहित नाही, पण प्रेक्षकांचं समाधान होईल हे नक्की,’ असं तो म्हणाला.

वाचा : …आणि सुशांतने आलियाच्या खास मैत्रिणीला किस केलं

२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टीचा ‘दिलवाले’ या चित्रपटालाही प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. काजोल आणि शाहरुख खान अशी तगडी जोडी असूनही अपेक्षेप्रमाणे यश त्याला मिळालं नव्हतं. त्यातही यंदा स्पर्धा आमिर खानच्या चित्रपटाशी असल्याने रोहितला आणखीनच काळजी वाटत आहे. आता कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.