‘बिग बॉस’ आणि वाद हे जणू समीकरणच झाले आहे. यंदाच्याही पर्वात वादांची परंपरा कायम ठेवत ‘बिग बॉस ११’ हा शो सुरु झाला. सलमान खानचे सूत्रसंचालन असलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात होऊन दोन आठवडेच झाले आहेत. त्यानंतर लगेचच सलमान आणि बिग बॉसच्या घरातील स्पर्धक जुबैर खान यांच्यात प्रचंड वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. हा वाद इतका टोकाला गेला की जुबैरने सलमानला थेट धमकी दिली. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता एक नवे प्रकरण समोर आले असून, यात आता सलमानचा बॉडीगार्ड शेरा याचे नाव समोर आले आहे.

वाचा : २८० रुपयांवरून ट्विंकल खन्ना दुकानदारावर भडकली

शेराने बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. शबनम या महिलेने शेराने आपल्याला बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, २० ऑक्टोबर रोजी शबनम हिला धमकीचा फोन आला होता. यावेळी संबंधित व्यक्तीने आपण शेरा बोलत असल्याचे सांगितले होते. जुबैर खानच्या प्रकरणात तडजोड करण्यासाठी शेराने सांगितले होते. पण त्यांनी नकार दिल्याने शेराने तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली. यानंतर शेराविरोधात भारतीय दंडविधान कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शेराने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आरोप करणाऱ्या महिलेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्याने केलाय. तसेच ही महिला कोण आहे, हेदेखील माहित नसल्याचे त्याने म्हटलेय.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

‘बिग बॉस’मधून हकालपट्टी झालेल्या जुबैरने सलमानवर गैरवर्तणुकीचा आरोप करत लोणावळ्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात संबंधित महिलेने त्याला मदत केलेली. या महिलेने ती जुबैरची बहीण असल्याचा दावा केला आहे. जुबैर बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ही महिला अनेकदा त्याच्यासोबत दिसून आली होती.