20 August 2017

News Flash

प्रश्नसंमंध !

गेल्या काही वर्षांपासून बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत...

विनायक परब | Updated: June 16, 2017 1:07 AM

विचार तर सर्वाच्याच मनात येत असतात. पण त्या विचारांना चालना देणे हे शिक्षणाचे मूलतत्त्व आहे. प्रश्न तर सर्वाच्याच मनात येत असतात, विचारही अनेकजण करतात. पण विचारपूर्वक प्रश्न किती जण विचारतात? किती जण प्रश्न विचारपूर्वक विचारल्याचे भासवतात? यातील प्रत्यक्ष आणि भास यामध्ये भेद किती जणांना करता येतो?

हे सारे प्रश्न मनात येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देशातील सद्य:स्थिती! गेल्या काही वर्षांपासून बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत, बदलत आहेत आणि बदलणारही आहेत. कारण बदल ही एक प्रक्रिया आहे. मात्र हा किरकोळ नाही तर मोठा बदल आहे. याची चुणूक आपल्याला पाहायला मिळाली ती १९९२-९३ साली. निमित्त होते रामजन्मभूमीचे आंदोलन. मंडल आयोगाच्या शिफारशींनी देश पेटत असताना याकडून इतरत्र लक्ष वळविण्यासाठी भाजपातील धुरिणांनी रामजन्मभूमीचा प्रश्न हाती घेतला. अर्थात या निर्णयाची भाजप किंवा िहदुत्ववादी कार्यकर्त्यांना कल्पना असण्याचे काही कारण नाही. तिथून प्रखर धर्मभावनेला वळण मिळाले. बाबरी मशीद पाडल्यानंतर ९२-९३ साली उसळलेल्या दंगली आणि त्यानंतर ९३ सालच्या मार्च महिन्यात झालेले मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट हा इतिहास झाला. दुसरीकडे जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली होती आणि जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेला भारतीय मध्यमवर्ग आणि नवमध्यमवर्ग उदयास येत होता. त्याच वेळेस या नवमध्यमवर्गाच्या आशा-आकांक्षा मग त्या धार्मिक असतील किंवा राजकीय आणि इतरही प्रखर होऊ लागल्या होत्या.

आजवरचा जगाचा इतिहास असे सांगतो की, क्रयशक्ती असलेला मध्यमवर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढतो त्यावेळेस मोठा सत्ताबदल होतो. त्याची सुरुवात त्यावेळेस झाली, मात्र त्याची परिणती २०१४ च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींना मिळालेल्या प्रचंड बहुमतामध्ये पाहायला मिळाली. त्या मध्यमवर्गाच्या हाती असलेली ती क्रयशक्ती अनेक महत्त्वाचे बदल घडवत असते. क्रयशक्ती आणि मानसिकता हातात हात घालून जाते, असे बाजार अर्थशास्त्राचे गणित सांगते. त्यावर मानसशास्त्र, राज्यशास्त्र आणि धर्मशास्त्र शिक्कामोर्तब करतात. क्रिकेटचा विश्वचषक अनेकदा जिंकण्याचा हाच कालखंड आहे. त्या विजयात मानसिकता खूप महत्त्वाची असते. ही मानसिकताच विजयश्री खेचून आणते, त्यासाठीचे शारीरिक बळ पुरवत असते. हा तोच कालखंड असतो की, ज्यावेळेस क्रयशक्ती असलेल्या या वर्गाच्या भावना अधिकाधिक तीव्र होत जातात. त्याला कारण असलेल्या अनेक गोष्टींमध्ये झुंडीचे मानसशास्त्र हाही एक महत्त्वाचा घटक कार्यरत असतो, कारण त्यांची संख्या खूप मोठी असते. याची परिणती मग प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्न विचारून संशय निर्माण करण्यामध्ये होते. कारण आपणच राज्यकत्रे असल्याचा गंड या मोठय़ा वर्गाच्या मनात असतो. अखेरीस त्याचे प्रतििबब विविध घटनांमध्ये समाजात पाहायला मिळते.

एकाच वेळेस अनेक गोष्टी होत आहेत. त्यात अनेक चांगल्या गोष्टीही आहेत. पण त्रासदायक व विचार करायला लावणाऱ्या घटनांमध्ये मात्र वाढ होते आहे. गायीबद्दल धार्मिक भावना असलेला एक मोठा वर्ग यापूर्वीही अस्तित्वात होता. सर्वच बाबींची तीव्रता वाढलेल्या अवस्थेत आता गोरक्षणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी अत्याचारांची प्रकरणे उघडकीस आली आहेत. गोरक्षणाच्या बाबतीतील सरकारचे निर्णय  हे अर्थशास्त्र, भावना आणि धर्म यांच्या बाबतीत गल्लत करणारे अधिकच असल्याचे दिसते. म्हणूनच तर स्वत: पंतप्रधानांना या प्रकरणात लक्ष घालून गोरक्षकांबाबत विधान करावे लागले.

गेल्या काही वर्षांमध्ये सर्वच बाबीतील आपल्या भावना वेगात टोकदार होत आहेत. मग मुद्दा जातीविषयीचा असो, सहिष्णुतेचा किंवा मग माध्यमांच्या आणि एकूणच समाजाच्या विचारस्वातंत्र्याचा. आपले विचारस्वातंत्र्य म्हणजे इतरांच्या विचारस्वातंत्र्याचा अधिक्षेप नव्हे याचाच आपल्याला विसर पडलाय की काय अशी स्थिती आहे. समाजात दोन तटांवर असलेल्या दोन विचारसरणींचे गणितही सोपे झाले आहे. तुम्ही कोणत्या तरी एका बाजूला असलेच पाहिजे, असा या दोन्ही गटांचा टोकाचा आग्रह असतो. कोणत्याही एका बाजूला न जाण्याची भूमिका तुम्ही घेतलीत तर भूमिका घेण्याचे धाष्टर्य़च नाही किंवा मग कुंपणावरचे असल्याचा आरोप केला जातो. खरे तर दरखेपेस अशी काही भूमिका घेण्याची आवश्यकता असतेच असे नाही. परंतु आपण कोणती तरी एक भूमिका घ्यावी ही दोन्ही गटांची गरज मात्र निश्चितच असते. या प्रकाराला टोकाचा युक्तिवाद असे म्हणतात. टोकाचा युक्तिवाद प्रगतीमधील सर्वात मोठा अडसर असतो, हे आजवर घरातील किरकोळ भांडणांपासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत वारंवार सिद्ध झालेले असतानाही हे दोन्ही गट तसा आग्रह लावून धरण्यात धन्यता मानत असतात.

पलीकडच्या बाजूला सामान्य नागरिक संभ्रमावस्थेत असतो. अखेरीस अनेकदा झुंडीचे मानसशास्त्र काम करते आणि मग तो झुंडीबरोबर जाण्याचा निर्णय आपसूकच घेऊन टाकतो. जे इतरांचे होईल तेच आपलेही आणि बहुतांश आपल्या बरोबरच आहेत, यात त्याला सुरक्षितता वाटत असते. झुंडीला सामोरे जाणाऱ्यांना अनेक प्रश्न विचारून हैराण तरी केले जाते किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवून त्यांना बदनाम तरी केले जाते. सुरुवात प्रश्नांनी झालेली असली तरीही एखाद्या व्यक्तीला, संस्थेला किंवा व्यवसाय उद्योगाला संशयाच्या भोवऱ्यात उभे करणे हे अंतिम उद्दिष्ट असते. कारण ज्याला संशयाच्या भोवऱ्यात उभे केले जाते त्याविषयी भूमिका घेणे बहुसंख्येने असलेले सामान्यजन नेहमीच टाळतात. सामान्यांकडे एक जबरदस्त शक्ती असते, परंतु त्या शक्तीचा त्यांच्याच नकळत गरवापर इतर कुणाकडून होत असतो हे त्यांच्या गावीही नसते.

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर प्रसारमाध्यमांना उद्योगाचा दर्जा मिळाला. या दर्जासोबत अनेक चांगल्या-वाईट वृत्तींचा शिरकावही त्यांच्यामध्ये झाला. पेडन्यूज हे त्यापकीच एक प्रकरण. छुप्या पेडन्यूजविषयी आणि भ्रष्टाचाराविषयी तर न बोलणेच चांगले. त्यापूर्वीही अनेक राज्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांमधील काही आपल्या हाताशी धरलेलेच होते. पण जागतिकीकरणानंतरच्या कालखंडात त्यात अनेक पटींनी वाढ झाली. सुरुवातीस हाताशी धरलेले आता आपल्यालाच चावते आहे, हे लक्षात आल्यावर राज्यकर्त्यांनी त्यांच्याविषयी प्रश्न विचारून संशय निर्माण करण्यास सुरुवात केली. प्रसंगी त्यांची बदनामी करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. यात दोन्ही बाजूंनी जोर तेवढाच होता, त्या त्या कालखंडात असलेल्या भक्तांचा आणि विरोधकांचाही. यात दोषाची दोन बोटे माध्यमांकडेही जातात, कारण त्यांनी मध्यंतरीच्या काळात आपला वापर होऊ दिला होता. वापर केला जातो व त्याची फळे चाखायला मिळत असतात तेव्हा काहीच वाटत नाही. पण ती फळे नंतर कडवट रूप धारण करतात तेव्हा डोके ठिकाणावर येते. असेच काहीसे माध्यमांचे झाले आहे.

आता तर सोशल मीडिया नामक व्यासपीठाने सर्वच खुले केले आहे. कुणीही यावे व्यक्त व्हावे, अशीच अवस्था आहे. मग फॉरवर्डस्च्या माध्यमातून राळ उठवली जाते. ‘‘मीडियाने हे कधी दाखवले आहे का तुम्हाला-आम्हाला?’’ असे प्रश्न उपस्थित केले जातात आणि संशयाचा भोवरा निर्माण केला जातो. त्या विचारलेल्या प्रश्नांपकी अनेक प्रश्न सपशेल खोटेही असतात. पण त्याची खातरजमा करायला वेळ कुणाला आहे? अलीकडेच झालेल्या एनडीटीव्ही प्रकरणात दोन्ही बाजूंनी सारे काही आलबेल होते, अशी काही स्थिती नाही. दोघांच्याही दोन बाजू आहेत आणि त्यात खरे-खोटे सारे आहे. पण या विषयाशी संबंधित प्रत्येक गटाला असे वाटते आहे की, आपले तेच खरे आणि लोकांनी कुणा एकाच्या बाजूने उभे राहायला हवे. खरे-खोटे हेदेखील आता सापेक्षच असल्यासारखी संभ्रमावस्था आहे. या अवस्थेत नेमके प्रश्नच आपल्याला नेमक्या उत्तरापर्यंत नेऊ शकतात. पण अलीकडे होते असे की, उत्तर ठरवून प्रश्न विचारले जातात. अनेकदा युक्तिवाद खोडून काढणे  जमणार नाही किंवा अशक्य आहे हे लक्षात येते तेव्हा संभ्रमावस्था निर्माण करण्याचे शस्त्र खुबीने वापरले जाते.

बौद्ध तत्त्वज्ञानातील नागार्जुन हा सर्वोत्तम प्रश्नकर्ता मानला जातो. प्रश्न कसे असावेत ते त्याने तर्कशास्त्राच्या मांडणीच्या आधारे दाखवून दिले. आणि त्याच वेळेस प्रत्यक्ष आणि भास यांच्यातील भेदही कसा ओळखावा हे स्पष्ट केले. त्याचाच आधार घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे. ज्ञान आणि तर्कशास्त्र हा त्या नेमक्या प्रश्नांचा पाया आहे. पण बाहेर मात्र सर्वत्र केवळ प्रश्नसंमंधच फिरत आहेत, असे चित्र आहे. हे प्रश्नसंमंध इतरांच्या नतिकतेविषयी, भूमिकेविषयी आणि प्रश्न विचारण्याच्या हक्क-अधिकारांविषयीच प्रश्न निर्माण करतात. गरज आहे ती या प्रश्नसंमंधांना ज्ञान आणि तर्कशास्त्राच्या आधारे सडेतोड प्रश्न विचारण्याची व त्याआधी स्वत:ची भूमिका तपासून पाहण्याची!
vinayak-signature
विनायक परब – @vinayakparab, vinayak.parab@expressindia.com

First Published on June 16, 2017 1:07 am

Web Title: changing social and political atmosphere in india
 1. U
  umesh
  Jun 21, 2017 at 1:07 am
  एक मान्य आहे की सध्या सारीच गोंधळाची परिस्थिती आहे वीस तीस वर्षापूर्वी असे नव्हते जातीयवाद आता अगदी अंगाला येऊन भिडला आहे तसे नव्हते मित्र कोणत्या जातीचा आहे याचा विचार कुणीच करत नसे पण आता नोकऱ्या कमी आणिलआरक्षणामुळे संधी जात असल्यामुळे शालेय स्तरापासूनच जातवाद डोक्यात भिनतो पण आता लोक गैरलागू का होईना पण प्रश्न उपस्थित तरी करतात त्यात ग्राम्यता असेल पूर्वी नेते सांगतील तसे करणे एवढेच कार्यकर्त्यांना माहीत आणि लोक तर आंधळे भक्तच होते पवार इंदिरा यशवंतराव यांचे अंध भक्त होतेच प्रश्न लोक नेत्यांना विचारू लागले आहेत त्यामुळे नेतेही ताळ्यावर आले आहेत हे ही यशच
  Reply
 2. S
  Sanjay jagtap
  Jun 20, 2017 at 10:16 pm
  Your articles are always good I like it
  Reply
 3. D
  DINESH D.
  Jun 17, 2017 at 1:26 pm
  चॅन लेख. सुंदर मांडणी.
  Reply
 4. सौरभ तायडे
  Jun 17, 2017 at 9:34 am
  सुंदर अप्रतिम लेख आहे. धन्यवाद . !!
  Reply
 5. V
  vaibhav Khedkar
  Jun 16, 2017 at 3:14 pm
  खूप मार्मिक लेख
  Reply
 6. Load More Comments