मुबलक पाऊस पडूनही वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पुरेसे जलसाठे नसल्याने ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागात येत्या सोमवारपासून १४ टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय लघु पाटबंधारे विभागाने घेतला असून त्यानुसार शहरी भागात आठवडय़ातून एकदा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात पाणीकपात लागू केली जाते. मात्र ठाणे जिल्ह्य़ात गेल्या दोन वर्षांपासून जानेवारी महिन्यापासून पाणीकपात करावी लागत आहे. वाढत्या शहरीकरणाच्या तुलनेत जलसाठे अपुरे असल्यानेच ही परिस्थिती ओढवली आहे. माधवराव चितळे समितीने केलेल्या शिफारशीनुसार २०१६ पर्यंत ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागात पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी काळू आणि शाई हे दोन धरण प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र आता २०१४ उजाडले तरी विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेले हे दोन्ही प्रकल्प अद्याप कागदावरच आहेत. तसेच अतिरिक्त पाणीपुरवठय़ाचे अन्य पर्यायही उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. परिणामी झपाटय़ाने वाढणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागात पाणी टंचाई सोसावी लागत आहे. सोमवार ६ जानेवारीपासून ठाणे, मीरा-भाइंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर या महापालिका तसेच अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये आठवडय़ातून एकदा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचे वेळापत्रकही ठरविण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी अंबरनाथ-बदलापूर, मंगळवारी-कल्याण-डोंबिवली, बुधवारी- ठाणे, भिवंडी आणि मीरा-भाइंदर, शुक्रवारी-एमआयडीसी, नवी मुंबई आणि उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.    
पुढील वर्षी बारवीचा दिलासा
*ठाण्यातील वाढत्या नागरीकरणाला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या कोणताही नवा जलस्रोत दृष्टिक्षेपात नसला तरी बारवी विस्तारीकरण प्रकल्प मार्गी लागल्याने २०१५ मध्ये जिल्ह्य़ातील शहरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
*या विस्तारित प्रकल्पातील पुनर्वसन आणि काही किरकोळ कामे सुरू असून येत्या मेअखेपर्यंत ती पूर्ण होऊन पुढील पावसाळ्यात बारवी धरणात दुप्पट जलसाठा होईल, अशी माहिती बारवी धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रकाश लोनकर यांनी दिली.
*सध्या पूर्ण भरल्यावर बारवी धरणात १७१ दशलक्ष घनमीटर जलसाठा असतो. विस्तारीकरणानंतर पुढील वर्षी ३४७ दशलक्ष घनमीटर पाणी साठणार आहे.  
विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेले काळू आणि शाई ही दोन्ही धरण प्रकल्पे अद्याप कागदावरच आहेत.