समन्वयक, सरकारी वकीलांच्या चिकाटीचे कौतुक; खटल्याला ‘बेस्ट कनव्हीक्शन’ म्हणून पुरस्कृत

फिर्यादीपासून महत्त्वाचे साक्षीदार, पंचांनी फिरवलेली साक्ष, तपास अधिकाऱ्याने साक्ष देण्यास दाखवलेली असमर्थता, बचावपक्षाच्या उलट तपासणीत गडबडलेले साक्षीदार, अशी दुबळी बाजू असूनही पोलीस आणि सरकारी वकिलांनी अत्यंत चिकाटीने परिस्थितीजन्य पुराव्यांची मालिका उभी करून एका हत्येप्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. दोषसिद्धता दर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आदर्श उदाहरण ठरू शकेल, हे लक्षात घेऊन पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या खटल्याला ‘बेस्ट कनव्हीक्शन’ म्हणून पुरस्कृत केले आहे.

मे २०१२मध्ये साकिनाका पोलिसांना विमानतळाजवळील निर्जन ठिकाणी अब्दुल सबूर शेख हा तरूण जखमी अवस्थेत आढळला. अत्यंत जवळून त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्याची बाब सीटीस्कॅनमधून स्पष्ट झाली. कोमात असलेल्या अब्दुलचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला. हत्येच्या काही दिवसांनी मुंबई गुन्हे शाखेने पुण्याच्या कामशेतहून अबू रहेवर हसन शेख उर्फ जीगरा याला अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल आणि रक्ताचे शिंतोडे उडालेले कपडे सापडले. रहेवर आणि मृत तरूण उत्तर प्रदेशातील एकाच गावचे शेजारी. तिथे चोरीच्या दोन गुन्हयांमध्ये रेहवरला अटक झाली होती. आपली माहिती अब्दुलनेच दिल्याचा संशय रेहवरला होता. त्यामुळे बदल्यासाठी हत्येच्या इराद्याने रेहवर मुंबईत आला.

हत्येआधी दोघे महोम्मद सागीर महोम्मद इद्रीस खान उर्फ मौलवी या मित्रासोबत होते. मौलवीच्या समोरच रेहवर अब्दूलला दुचाकीवरून घेऊन गेला. जखमी अब्दूलला मौलवी व अन्य पादचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे मौलवी या प्रकरणातील फिर्यादी होता. साकिनाका पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले व प्रत्यक्ष खटल्याचे कामकाज सुरू झाले तेव्हा मौलवीने साक्ष फिरवली. हल्ला घडला तेव्हा गोळीबाराचा आवाज ऐकला, एका तरूणाला तेथून धावताना आम्ही पाहिले, अशी माहिती देणारे दोन स्वतंत्र साक्षीदारही फिरले. त्यात प्रमुख तपास अधिकारी तत्कालिन पोलीस निरीक्षक सुर्यकांत सावंत यांनी न्यायालयात मानसिक स्थिती ठिक नसल्याने साक्ष देण्यास असमर्थता दर्शवली. रेहवरला अब्दुलवर संशय होता, त्याने अब्दुलला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा जबाब देणारे नातेवाईकही न्यायालयात गडबडले, काहींनी साक्ष फिरवली.

साक्षीदारांनी घातलेला गोंधळ आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचा फायदा घेत बचावपक्षाने गोळ्या झाडणारा भलताच कोणीतरी असावा, असा दावा लावून धरला. पोलिसांनीच अब्दुलची हत्या केली असावी, असा आरोप बचावपक्षाने केला. एकूणच आरोपी रेहवर निर्दोष सुटण्याच्या बेतात होता. तेव्हा साकिनाका पोलीस ठाण्याचे परवी (समन्वयक) अधिकारी बाबुलाल िशदे, सरकारी वकील अ‍ॅड. वीणा शेलार यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांची भक्कम मालिका सादर करत रेहवरनेच गुन्हा केल्याचे न्यायालयाला पटवून दिले.

अटक झाली तेव्हा अंगझडती पंचनामा करणाऱ्या पंचाने रेहवरकडून रक्ताचे डाग असलेले कपडे, गावठी कट्टा, जिवंत काडतुसे व मोबाईल फोन सापडल्याचे न्यायालयाला सांगितले. याच गावठी कट्टयाने अब्दुलवर गोळ्या झाडल्याचा बॅलेस्टीक तज्ज्ञांचा अहवाल होता. आरोपीकडून सापडलेल्या कपडय़ांवरील रक्त अब्दुलचे आहे. तसेच पोलिसांनी घटनास्थळाहून हस्तगत केलेली रक्तमिश्रीत माती व साधी माती, रेहवर व अब्दूल यांना एकत्र पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीची साक्ष, अब्दुलला ठार मारण्याच्या इराद्यानेच रेहवरचने मुंबई कशी गाठली हे न्यायालयाला पटवून देण्यात सरकारपक्ष यशस्वी ठरला. त्याआधारे सत्र न्यायाधीश श्रीधर भोसले यांनी अलीकडेच रेहवरला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या खटल्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त छेरींग दोरजे, तत्कालिन उपायुक्त(मुख्यालय) शारदा राऊत यांचे अभियोग पक्षाला विशेष सहकार्य लाभले.

[jwplayer 9xaU4cUi]

पाच महिन्यांत नऊ खटल्यांमध्ये दोषसिद्धता

पाच महिन्यांमध्ये १३ पैकी ९ प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात साकिनाका पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे शहरातील अन्य पोलीस ठाण्यांच्या मानाने दोषसिद्धीत साकिनाका पोलीस ठाणे अव्वल ठरले आहे. उर्वरित ४ पैकी दोन खटल्यांमध्ये फिर्यादी व आरोपींमध्ये समझोता झाला. तर पॉस्कोच्या एका प्रकरणात बळीत मुलीने आपली तक्रार मागे घेतली.

२०१५मध्ये संपूर्ण देशाचा दोषसिध्दी दर ४६ टक्के होता. मिझोराम, केरळ, छत्तीसगढ, राजस्थान, नागालॅण्ड अशा अनेक राज्यांमध्ये दोषसिध्दी दर सरीपेक्षा खुप जास्त आहे. मिझोराममध्ये ९३ टक्के खटल्यांमध्ये आरोपी दोषी आढळले. केरळमध्ये हेच प्रमाण ८३ टक्क्यांवर आहे. महाराष्ट्रात दोषसिध्दी दर ३३ टक्क्यांवर आहे. २०१५मध्ये महाराष्ट्रात १ लाख १० हजार ५०१ खटल्यांची सुनावणी पूर्ण झाली. त्यापकी ३६ हजार ४५० खटल्यांमध्ये आरोपी दोषी ठरले आणि त्यांना शिक्षा झाली. ७४ हजार ५१ खटल्यांमध्ये आरोपी निर्दोष ठरले किंवा दोषमुक्त करण्यात आले.